Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुढील तीन दिवस दुपारच्या वेळी ढगाळ, मराठवाड्यात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 15:03 IST

शेतकऱ्यांनी काय करावे? वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने दिला कृषीसल्ला

राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाड्यात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडयात पुढील तीन दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक 21 मे रोजी जालना, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक 22 मे रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी व हिंगोली जिल्हयात व दिनांक 23 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 24 ते 30 मे दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

  • मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये कापूस पिकाची लागवड करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली 60 ते 100 सेंमी असावी मध्यम ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत तूर पिकाची लागवड करावी.  
  • चोपन व क्षारयुक्त जमिनीत तूर पिकाची लागवड करू नये. तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात. 
  • योग्य निचऱ्याच्या मध्यम ते भारी जमिनीत मुग/उडीद या पिकांच्या लागवड करावी. एकदम हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही. पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. 
  • मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाणअसलेल्या जमिनीत भुईमूग  पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. 
  • तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या भुईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  मध्यम ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिनी मका पिकाची लागवड करावी.

टॅग्स :हवामानमराठवाडापाऊसपीक व्यवस्थापन