यंदा जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील ६७पैकी ६१ प्रकल्प तुडुंब भरले असून, उपयुक्त पाणीसाठा ८३.९३ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने गावागावातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.
शिवाय रब्बी हंगामातील पाणीप्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांची चिंताही मिटली आहे. ऑक्टोबर महिना संपला तरी जिल्ह्यात यंदा पावसाची हजेरी कायम आहे. विशेषता सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी ओळ्यांना पूर आला होता.
शिवाय जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडल्याने गोदावरी नदी दुथडी वाहत होती. सातत्याने पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ६७ पैकी ६१ प्रकल्प तुडुंब भरले आहेत. दोन प्रकल्पांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान तर चार प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्क्यांदरम्यान उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. दुसरीकडे ६१ पैकी ५७ प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहेत.
प्रकल्पांच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया
जिल्ह्यातील प्रकल्पांत ८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. परंतु, बहुतांश प्रकल्पांना गळती लागल्याने दैनंदिन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ही पाणीगळती वेळेत रोखली नाही तर प्रकल्प भरलेले असतानाही भविष्यात पाणीटंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मध्यम प्रकल्प १०० टक्के
• जिल्ह्यातील सातही मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. जालना तालुक्यातील कल्याण गिरजा, कल्याण मध्यम प्रकल्प भरले आहेत. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना, भोकरदन तालुक्यातील जुई, धामना प्रकल्प भरले आहेत.
• जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा व अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पही तुडुंब भरला आहे. हे प्रकल्प भरल्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.