जायकवाडी धरणातूनपाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे सर्वच्या सर्व २० दरवाजे रविवारी दुपारी उघडण्यात आले. परिणामी गोदावरी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.
गंगाखेड शहरासह तालुक्याच्या बहुतांश डोंगरी भागासाठी पिण्याचे पाणी व सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मासोळी प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले आहे. तालुक्यातील ६ पैकी ४ लघुतलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.
जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. ७५३३८.८९ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी मुळी बंधाऱ्याखालील गोदावरी नदीस मोठा पूर आला आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
माखणी येथील मासोळी मध्यम प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाला. पाण्याची उंची ३ मीटरने वाढून मासोळी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तालुक्यातील पिंपळदरी साठवण तलाव व नखतवाडी लघुतलाव वगळता राणीसावरगाव, कोद्री, टाकळवाडी व तांदुळवाडी हे चार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.
निन्म दुधनेचे चार दरवाजे उघडले, २६८० क्युसेक विसर्ग
दोन दिवसापासून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी चार दरवाजे उघडून २६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधना नदी पात्रात करण्यात आला आहे. पाण्याची आवक लक्षात घेऊन रविवारी दुपारी साडेचार वाजता चार पैकी दोन दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत एक व वीस असे दोन दरवाजे उघडून ६७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
येलदरी धरणातून २७०० क्युसेकने विसर्ग
मागील काही दिवसांपासून येलदरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने येलदरी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान, रविवारी जलविद्युत केंद्राच्या तीन युनिटमधून २७०० क्युसेकने विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे पूर्णा नदीची पाणीपातळी वाढली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.