Join us

कुकडी प्रकल्पात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६ टक्के जादा पाणी; येडगाव, घोड, विसापूर, वडज ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:04 IST

Kukdi Dam Water Storage Update : कुकडी प्रकल्पात सद्यःस्थितीला १५ हजार ८५१ एमसीएफटी म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३६ टक्क्यांनी अधिक आहे. प्रकल्पातील येडगाव, घोड, विसापूर, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. सध्या मात्र, कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे.

बाळासाहेब काकडे 

कुकडी प्रकल्पात सद्यःस्थितीला १५ हजार ८५१ एमसीएफटी म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३६ टक्क्यांनी अधिक आहे. प्रकल्पातील येडगाव, घोड, विसापूर, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. सध्या मात्र, कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे.

यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे येडगाव धरणातून ३६०, वडज धरणातून ८३७, चिल्हेवाडी धरणातून १ हजार ५१०, विसापूर तलावातून २७, तर घोड धरणातून सर्वाधिक ७ हजार ४७० एमसीएफटी पाणीनदीपात्रात सोडून देण्यात आले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यांना प्राधान्याने सोडण्यात आले. येडगाव धरण पाणलोट क्षेत्रात १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सध्या माणिकडोह धरणात २ हजार ८९२ एमसीएफटी (२८ टक्के) इतके उपयुक्त पाणी आणि पाणलोट क्षेत्रात ४८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वडज धरणात ८०५ एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरण सध्या ६८ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात २६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात ३३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी धरणात हजार २४१ एमसीएफटी म्हणजे ३४ टक्के पाणी आले आहे. डिंबे धरण पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ५५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात ९ हजार ५२८ एमसीएफटी (७६ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

घोड धरणात ४ हजार ५७६ एमसीएफटी (९३ टक्के) इतका पाणीसाठा आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, विसापूर तलाव प्रथमच पावसाच्या पाण्याने भरला आहे. चिल्हेवाडी धरण ओसंडून वाहत आहे.

...तर उन्हाळ्यात पाणीटंचाई

माणिकडोह धरणात सध्या फक्त २८ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. यंदा हे धरण भरणे आवश्यक आहे. जर हे धरण १०० टक्के भरले नाही तर कुकडी लाभक्षेत्रात उन्हाळ्यात पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. शासनाने डिंबे माणिकडोह बोगद्याचे काम सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे.

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

टॅग्स :अहिल्यानगरपाणीधरणनदीशेती क्षेत्रपाऊसजलवाहतूक