सातत्याने होत असलेल्या पावसामुळे वीर धरणात पाण्याची भरघोस आवक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता नीरा नदीच्या पात्रात ३२०० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यकारी अभियंता, निरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. सध्या धरण क्षेत्रात अधून-मधून पावसाचे प्रमाण कायम असून, त्यामुळे पुढील काही दिवसांत धरणातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विसर्गाचे प्रमाण नियंत्रित पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. नीरा नदीच्या दोन्ही तीरावरील गावकऱ्यांना प्रशासनाने विशेष इशारा दिला आहे.
नदीपात्राजवळ अनावश्यकपणे न थांबता तसेच जनावरे, शेती साहित्य, वाहने इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याची आवक व पावसाची तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये वेळोवेळी वाढ अथवा घट होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या नीरा नदीकाठच्या गावांनी सतर्कता पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन सिंचन विभागाने केले असून, स्थानिक प्रशासनालाही आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.