टेंभुर्णी : सोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीतपाणी सोडण्यात आले आहे. मुख्य कालवा तसेच डावा व उजवा कालवा यामधून यापुढे पाणी सुरू राहणार असून, सकाळी ९ वाजता वीजनिर्मिती केंद्रातून १ हजार ६०० क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे.
सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या टाकळी व चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. शेतीसाठी कालवा, बोगदा व सिंचन योजनेद्वारे उन्हाळी आवर्तन सुरूच राहणार आहे.
२० एप्रिलपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या मागणी पत्रानुसार पाटबंधारे खात्याकडून ८ एप्रिल रोजी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
टप्प्याटप्प्याटने त्यात वाढ करून ६ हजार क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता ४ हजार ६०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.
उजनी धरण ते टाकळी व चिंचपूर बंधारा हे २३२ किलोमीटर अंतर नदीतील पाण्यास पार करून जाण्यास आठ ते नऊ दिवस कालावधी लागतो, यासाठी ६ हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येणार असल्याचे धरण नियंत्रण विभागाकडून कळविण्यात आले आहे.
धरणात १० टीएमसी उपयुक्त पाणीसाठासध्या उजनी धरणात १० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, २० एप्रिलनंतर उजनी मृत साठ्यात जाऊ शकते. तर पाणी पातळी १९ टक्के सायंकाळी ६ वाजता होती. उजनी धरणाच्या मुख्य कालव्यातून २ हजार ९५० क्युसेक विसर्ग, भीमा-सीना जोड कालवा (बोगदा) मधून ८१० क्युसेक, सीना माढा सिंचन योजनेला ३३३ क्युसेक व दहिगाव १२० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
अधिक वाचा: उन्हाळ्यात ऊस पिकाला पाणी कमी पडतंय? करा ह्या उपाययोजना