इसापूर धरणातील पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणाचे तेरा दरवाजे शनिवारी रात्रीपासून उघडण्यात आले. यामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठ परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान शनिवारी दुपारपासून विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. तर पुसद-हिंगोली राज्य मार्ग बंद असून, नदीच्या पुलावर पाच ते सहा फूट पाणी असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तसेच रविवारी सकाळी ९ वाजेपासून धरण पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सांडव्याची सात वक्रद्वारे दीड मीटरने, तर सहा वक्रद्वारे एक मीटरने उचलण्यात आल्याने पैनगंगा नदीत ५४ हजरी ४६६ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
इसापूर धरणाचे गेट उघडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती जलमय झाली असून, तूर, हळद, सोयाबीन, कापूस, उडीद, ऊस या पिकांचे नुकसान झाले आहे.