घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी सुरू केलेल्या बचत गटाद्वारे विविध उत्पादने तयार करून विक्री करत चिखली (ता. बदनापुर) येथील रुपाली आज यशस्वी उद्योजिका झाल्या आहेत.
शेतकरी कुटुंबातील रुपाली नितीन निकम यांची जालना जिल्ह्याच्या चिखली (ता. बदनापुर) येथे शेती आहे. मात्र, अल्प उत्पन्न असल्याने वारंवार बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण व्हायची. यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी रुपाली यांनी गावातील पंधरा महिलांना सोबत घेऊन २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) पंचायत समिती बदनापुर अंतर्गत श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाची स्थापना केली. यात वंदना सुनील देशमुख या सचिव तर रुपाली निकम या अध्यक्षा होत्या.
पुढे याच गटाच्या माध्यमातून दाळमिळ व्यवसाय सुरू करण्याचा विचार रुपाली यांनी मांडला. सर्वांच्या सहकार्याने आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत ३ लाख रुपयांचे अनुदान मिळवून गटाच्या सचिव वंदना देशमुख यांच्या जागेवर २२ फूट बाय २८० फूट आकाराचे शेड उभारून दाळमिळ सुरू झाली.
शेतकऱ्यांचा सहभाग ठरला महत्वाचा
दाळ प्रक्रियासाठी लागणारे कडधान्य परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते. ज्यावर प्रक्रिया करून रुपाली यांच्या गटामार्फत 'जिविका' या नावाने पुढे बाजारात विक्री केली जाते. बाजारभावांपेक्षा अधिक दराने खरेदी होत असल्याने शेतकरी सेंद्रिय पद्धतीने कडधान्याची शेती करतात. या उद्योगामुळे शेतकरी व रुपाली यांचा गट दोन्ही फायद्यात आले असून यामुळेच या गटाच्या प्रक्रिया उद्योगात शेतकऱ्यांचा सहभाग मोलाचा ठरला आहे.
प्रशिक्षणाने दिली दिशा
गटाच्या महिलांनी कृषि विज्ञान केंद्र बदनापूर, उम्मेद अभियान पंचायत समिती बदनापूर आणि तेजस जन विकास संस्था द्वारे कौशल्य आधारित प्रशिक्षण घेतले आहे. यामुळे अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होत प्रत्येक सदस्याला व्यवसायाच्या विविध भागांमध्ये काम करण्याची संधी मिळाली असून आत्मविश्वास वाढला असल्याच्या रुपाली सांगतात.
आत्मनिर्भर होण्याचा मिळाला विश्वास
रुपाली यांच्या या व्यवसायामुळे गटातील महिलांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत बदल झाला आहे. हे बघत आता चिखली परिसरातील इतर महिलांनीही आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.
'जीविका'त असा आला जिव
"जीविका" हा एक विशेष सामाजिक उपक्रम होता. जो जालना जिल्ह्यातील महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आला होता. या ब्रँडचा मुख्य उद्देश महिलांना रोजगार निर्माण करणे, त्यांना स्वयंपूर्ण बनवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे होता. ज्याची सुरुवात जालना जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केली असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे हा उपक्रम यशस्वी होऊ शकला आहे.
गटाच्या व्यवसायाचा आता झाला मोठा विस्तार
दाळमिळ बरोबरच रुपाली यांनी आता गहू क्लिनिंग मशीन, शेवया तयार करण्याचे मशीन, शेंगा फोडणी यंत्र, मसाला तयार करण्याचे मशीन, गव्हाचे चिक काढण्याचे मशीन आणि पिठाची गिरणी अशा विविध मशिनरी मिळून एकूण दहा लाखांची वाढीव अलीकडे गुंतवणूक केली आहे. ज्यातून आता या उद्योगाचा आता मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून मराठवाड्याच्या यशस्वी उद्योजिका म्हणून श्री स्वामी समर्थ गटाच्या रुपाली आणि त्यांच्या सहकारी महिला नावारूपाला येत आहे.
माहिती स्त्रोत
विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण), केव्हीके, बदनापूर जि. जालना (९४२०४५४२६९).
कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, बदनापूर जि. जालना (९४०४९५७३५६).