Join us

नोकरीच्या मागे न लागता केली कलिंगडाची आधुनिक पद्धतीने शेती; घेतले एकरी ४० टन उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:41 IST

Farmer Success Story कुंभारी (ता. जत) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी हरीबा दामोदर पाटील यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.

दरीबडची: कुंभारी (ता. जत) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी हरीबा दामोदर पाटील यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.

फोंड्या माळरानावर पाच एकर क्षेत्रावर त्यांनी कलिंगडाची बाग फुलवली असून, एकरी ४० टन उत्पादन मिळवले आहे. दहा लाख रुपयांचा नफाही मिळवला. 

कुंभारी येथे म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. शेती बागायत झाली आहे. ऊस, मका, भाजीपाला पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

कमी खर्चात अधिक उत्पादन येत असल्याने शेतकरी कलिंगड पीक उत्पादनाकडे वळताना दिसत आहे. हरीबा पाटील यांची बागेवाडी रस्त्यावर सात एकर शेती आहे. त्यांनी औषधनिर्माण शास्त्रचे (बी. फार्मसी) शिक्षण घेतले आहे.

मुळात शेतीची आवड असल्याने नोकरी, व्यवसाय न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या तीन एकर जागेत व आजोबा सोपन पाटील यांची दोन एकर जमीन खंडाने घेऊन कलिंगडाची लागवड केली.

कलिंगड शेतीची माहिती गूगल, यू ट्यूबवरून घेतली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली. मध्यम प्रतीच्या जमिनीतसुद्धा नंदनवन उभे करता येते, हा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. 

अशी केली लागण प्रथम एकरी चार ट्रॉली शेणखत टाकून रान तयार केले. पाच फुटांच्या अंतराने बेड तयार केले. रोपवाटिकेतून रोपे घेतली. २० दिवसांनंतर रोपांची लागवड केली. एकरी आठ हजार कलिंगड रोपांची लागवड केली. यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. 

या खताचा केला वापर बेडमध्ये डीएपी, युरिया, पोटॅशियम, मॅग्निशियम सल्फेट, निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट असा रासायनिक खतांचा डोस दिला. कॅल्शियम नायट्रेट, बोरोन, कॉम्बी औषधे ड्रिपव्दारे सोडली. अॅक्ट्रा, एसबेयन, कीटकनाशके वापरली. 

जागेवरच किलोला पाच रुपये दर एकरी ४० टन उत्पादन मिळाले. पाच एकरात २०० टन उत्पादन मिळाले. प्रति रोप ५ किलो उत्पादन मिळाले. मशागत, औषधांचा खर्च वजा जाता कलिंगड ६० ते ६५ दिवसांत कलिंगड विक्रीस आले. व्यापाऱ्याने जागेवर ५ रुपये किलो दिला.

योग्य नियोजन करून कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे कलिंगड पीक घेण्यास हरकत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती केल्यास त्याचा फायदा होतो. - हरीबा पाटील, तरुण शेतकरी, कुंभारी, ता. जत 

अधिक वाचा: पॉलीटनेल सोलर ड्रायरच्या मदतीने सुरु करा फळे व भाजीपाला वाळविण्याचा व्यवसाय; वाचा सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीभाज्याबाजारलागवड, मशागतपीकखतेसेंद्रिय खतपीक व्यवस्थापनफलोत्पादन