जळगाव : भडगाव तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची लागवड केली आहे. मात्र योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्ट यांच्या जोरावर गोंडगाव येथील शेतकरी बालचंद्र पाटील यांनी सव्वाचार एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवले आहे.
बालचंद्र पाटील यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत प्लास्टिक आच्छादन करून टरबुजाची लागवड केली. या पद्धतीमुळे शेतातील तण व गवत कमी होते. तसेच निंदणीसाठी लागणारा मजुरीचा खर्चही वाचतो.
गोंडगाव शिवारातील शेतात दोन टप्प्यांत लागवड
बालचंद्र पाटील यांनी गोंडगाव शिवारातील शेतात दोन टप्प्यात टरबुजाची लागवड केली. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी अडीच एकर क्षेत्रात टरबूज बियाण्यांची लागवड करण्यात आली. या क्षेत्रातून पहिल्या तोडीत सुमारे ४८ टन टरबूज उत्पादन मिळाले. त्याला प्रतिकिलो २२ रुपये असा चांगला दर मिळून सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचा माल विक्री झाला.
या क्षेत्रासाठी खत, औषध फवारणी, मजुरी आदींसह सुमारे २ लाख रुपये खर्च आला. पुढील तोडीत सुमारे २० टन माल निघण्याची अपेक्षा असून, अडीच एकरातून सुमारे १२ लाखांचे एकूण उत्पन्न अपेक्षित आहे. १० जानेवारीला बाजूच्या पावणेदोन एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड करण्यात आली. या क्षेत्रातून ३० टन उत्पादन मिळाले. या टरबुजाला प्रतिकिलो २५ रुपये ५० पैसे असा चांगला दर मिळाला. या लागवडीसाठी जवळपास १ लाख रुपयांचा खर्च आला.
व्यापाऱ्यांमार्फत दिल्लीला थेट विक्री
दोन्ही क्षेत्रांतील टरबूज मजुरांकडून तोडणी करून बांधावरच ट्रकमध्ये भरले गेले आणि व्यापाऱ्यांमार्फत थेट दिल्ली बाजारपेठेत पाठविण्यात आले. सव्वाचार एकर टरबूज लागवडीसाठी एकूण ३ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. जवळपास १८ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले.
त्यातून सुमारे १५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. मोठा मुलगा गोविंदा पाटील व लहान मुलगा शंकर पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी मेहनतीने हा मळा फुलवला.
आपल्या घरगुती सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे, हे कसं ओळखायचं, पहा ही सोपी ट्रिक
