फैज्जुला पैठाण
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील विठ्ठल तांगडे यांनी आजच्या काळात नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
बीएस्सी ॲग्री पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता त्यांनी घरच्या शेतात नवनवीन प्रयोग करत केवळ तीन एकर शेतात मिरची आणि कोथिंबिरीची लागवड करून तब्बल २८ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
विठ्ठल तांगडे यांनी सुरुवातीला शेतात रोपवाटिकेसाठी शेडनेट तयार केले. परिसरातील शेतकऱ्यांना परवडतील अशा दरात मिरची, कोबी, वांगी, टोमॅटो आदी भाजीपाल्याची रोपे तयार करून देण्यास सुरुवात केली.
त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांमधून महागात रोपे आणण्याची गरज भासली नाही. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या तीन एकर शेतात पारंपरिक पिकांना फाटा देत ज्वेलरी मिरचीची लागवड केली.
त्यांनी शेतात २५ एप्रिल २०२५ रोजी मिरचीची लागवड केली असता, ऑगस्टच्या अखेरीपर्यंत ३४७ क्विंटल मिरचीचे उत्पादन झाले. ही मिरची बाजारात विक्री करून त्यातून तब्बल २१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे.
तरुणाने पारंपरिक शेतीला दिला फाटा
केवळ पाच महिने व २० दिवसांच्या कालावधीत दोन पिकांचे नियोजनबद्ध उत्पादन घेऊन विठ्ठल तांगडे यांनी तीन एकर शेतातून एकूण २८ लाखांचे उत्पन्न मिळवले. पारंपरिक शेतीपासून दूर जाऊन आधुनिक व नियोजनबद्ध शेतीद्वारे कसा यशस्वी शेतकरी होऊ शकतो, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
कोथिंबिरीतून पाच लाख रुपयांचा मिळवला नफा
• अकोला, नागपूर, अमरावती, जळगाव, पुणे बाजारपेठेत कोथिंबिरीला चांगला भाव मिळत असल्याने वालसावंगी येथील व्यापारी संदीप वाघ यांनी तीन एकरांचा संभार सरसकट ६ लाख ११ हजार रुपयांना खरेदी केला.
• १८ ऑक्टोबरपासून मजुरांमार्फत १३० क्विंटल सांभार काढला असून, अद्यापही २५ ते ३० क्विंटल शिल्लक आहे.
शेतीला दिला फाटा
ही मिरची बाजारात विक्री करून तब्बल २१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. पिकावर सुमारे ५ लाखांचा खर्च आला. त्यानंतर त्यांनी ५ सप्टेंबर रोजी त्याच शेतात कोथिंबिरीसाठी धने बी पेरले. केवळ ४५ दिवसांत चांगला सांभार (कोथिंबीर) तयार झाला.
हेही वाचा : एमपीएससी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट; दोन एकर अद्रक शेतीतून कमावले १५ लाख