Join us

तुर्की बाजरीने केली कमाल ढेकळवाडीचे शेतकरी नानासाहेब झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:11 IST

आयटीआय शिक्षक नानासाहेब दिनकर बिचकुले यांनी आपल्या शेतात तुर्की देशातील बाजरीचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे लसूण, कांदा शेतात आंतरपीक म्हणून बाजरीचे घेतलेले पीक जोमदार आले असून यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

गजानन हगवणेढेकळवाडी (ता. बारामती) येथील आयटीआय शिक्षक नानासाहेब दिनकर बिचकुले यांनी आपल्या शेतात तुर्की देशातील बाजरीचेपीक घेतले आहे. विशेष म्हणजे लसूण, कांदा शेतात आंतरपीक म्हणून बाजरीचे घेतलेले पीक जोमदार आले असून यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

बाजरीचे कणीस तब्बल तीन फूट लांब आहे. बारामती तालुक्यात अनेक शेतकरी बाजरीचे पीक घेतात. मात्र त्या कणसाची लांबी एक फुटापर्यंतच असते. तुर्की देशातून आलेले हे बाजरीचे वाण तीन फुटांपेक्षा जास्त वाढत असल्याने यातून भरघोस उत्पन्न मिळणार आहे.

बिचकुले यांनी २० गुंठे क्षेत्रामध्ये डोंडू पीक निघाल्यानंतर त्या तयार बेडवर बाजरीची टोकन पद्धतीने पेरणी केली. त्यामुळे त्यांना बाजरीच्या बियाण्याचा खर्च आला. स्वतः बिचकुले व त्याच्या पत्नी यांनी बाजरी बीचे टोकन केले तसेच आंतरपीक म्हणून कांदा व लसणाचे पीक घेतले.

हा परिसर छत्रपती कारखान्यामुळे ऊस पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बिचकुले यांच्यासारखे अनेक शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत. बाजरी पिकावर कूस जास्त असल्याने पक्षी त्यांना खात नाहीत. त्यामुळे पक्ष्यांपासून त्याचे संरक्षण होते. ही बाजरी खायलाही चवदार आहे.

शिवाय येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी ठरणार आहे, बाजरीतून प्रति एकरी ४० क्विंटल उत्पन्न मिळते. मात्र बिचकुले यांना एकरी ३० क्विंटलचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. एकीकडे तालुक्यातून बाजरी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना यांनी केलेल्या प्रयोगाचे परिसरातून कौतुक होत आहे.

अनेक शेतकरी ही बाजरी पाहण्यासाठी येत आहेत, तुर्की देशातून येणारे बियाणे प्रति किलो दीड हजार रुपये या दराने बिचकुले यांनी खरेदी केले आहे. तुर्की बाजरीचे पीक जोमात आले असून ते फुलवरा अवस्थेत आहे, ढेकळवाडीचे माजी सरपंच राहिलेले नाना विचकुले यांना क्षेत्र कमी आहे.

मात्र त्यानी फूलशेतीसह विविध प्रयोग राबवत प्रगती साधली आहे. त्यांनी नेहमी नगदी पिकांना प्राधान्य दिले आहे. तुर्की बाजरीची लागवड करून त्यांनी वेगळा प्रयोग यशस्वी केला आहे.

ढेकळवाडी परिसरात तुर्की वाणाचे बाजरीचे पीक प्रथमच घेतले आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. पेरणीपेक्षा टोकण पद्धतीचा अवलंब केल्याचे बियाणे कमी लागते त्यामुळे खर्चही कमी येतो. तुर्की वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना कमी दराने उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच बाजरी पिकाबरोबरच आंतर पीक घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्नासाठी असे प्रयोग राबवावेत - नानासाहेब बिचकुले, ढेकळवाडी

अधिक वाचा: उन्हाळी काकडीने निमसाखरच्या शेतकऱ्याला दिला आर्थिक गारवा

टॅग्स :शेतकरीबाजरीशेतीइंदापूरपीकपीक व्यवस्थापन