सुनील पाटीलकसबा वाळवे: विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जावा जावा मधील दुरावा वाढत असताना चंद्रे ता. राधानगरी येथील पाटील कुटुंबीयातील तीन जावांनी एकत्रितपणे पारंपारिक ऊस पिकाऐवजी झेंडूची शेती केली आहे.
गेले नऊ वर्षे कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेत शेतकऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे. दूधगंगेतील मुबलक पाण्यामुळे बहुतांश ऊसशेती असताना चंद्रे येथील पाटील कुटुंबीयातील सारिका, कल्पना व पूजा पाटील या तीन जावांनी झेंडू शेती फुलवली आहे.
पारंपारीक शेतीला बगल देत नव्या शेती प्रयोगात या महिला चांगल्याच रमल्या आहेत. शिवाय ऊसापेक्षा जादा नफा मिळवत आहेत.
यांच्या दर्जेदार फुलांना कोल्हापूरसह स्थानिक पातळीवर मोठी मागणी आहे.संत बाळूमामा उत्सव व गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने चांगला दर मिळवून मोठी कमाई केली आहे.
उसाचे नुकसान करणाऱ्या हुमणी व सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उसात आंतरपीक म्हणून झेंडूच्या रोपांची एकसरी आड सरी लागवड करण्याचा नवा प्रयोग चंद्रे येथील पाटील कुठूबांने गेल्या नऊ वर्षापूर्वी केला होता.
हा नवा नाविण्यपूर्ण प्रयोग यशस्वी होऊन आंतरपीकातून चांगला नफा मिळाला, शिवाय ऊस शेतीही जोमदार आली आहे. यावर्षी पासून उन्हाळा व पावसाळा दोन्ही ही हंगामात झेंडू फुलांची शेती केली आहे.
या झेंडू पीक शेतीची संपूर्ण कामांची जबाबदारी या तीन जावांच्याकडे आहे. यामध्ये कोणत्या हंगामात कोणत्या जातींची रोपे हवीत त्याची त्या निवड करतात.
मशागतीनंतर रोपांची लागण, खते व संजीवकांची आळवणी, किटकनाशक फवारणी, भांगलण, भर लावणे ,पाणी पाजणे, फुलांची तोडणी प्रसंगी विक्रीची करणे अशी कामे आणि लेखाजोखा ठेवणे हे जबाबदारी महिला पार पाडतात.
घरातील पुरुष मंडळीची साथ, प्रोत्साहन असते व ते बाजारपेठ सांभाळतात. तर घरातील शालेय मुलांचीही शेतीकामात मदत लाभते.
शेतीतील समस्यांना खचून न जाता पाटील परिवार शेती व शेती संबंधित उद्योगाचे नवनवीन प्रयोग करत असतात. भाजीपाला, ऊस रोपवाटीका, दुग्धव्यवसाय, कृषीनिविष्ठा विक्री, असे जोडधंदेही हे परिवार सांभाळत आहेत.
सर्व कुटुंब प्रत्येक जबाबदारी आवडीने करतात. या पाटील परिवारातील तीन जावांच्या शेती प्रेम व कष्टाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
झेंडू शेतीची वैशिष्ट्ये- २५ गुंठे ऊस शेतीत झेंडूचे आंतरपीक.- दहा गुंठे स्वतंत्र झेंडू शेती.- अंदाजे एक दीड लाखावर उत्पन्न व खर्च ५० हजार.- उसावरील हुमणी व सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश.- दरवर्षी स्वअनुभवातून नाविन्यपूर्ण प्रयोग.- गेली नऊ वर्षे झेंडू शेतीचा प्रयोग यशस्वी.- उसात आंतरपीक केल्याने उसावरील किडीवरही नियंत्रण मिळते.
झेंडूच्या बागेत काम करताना ही फुले देवांच्या चरणी, सत्काराला वापरतात याचे मोठे समाधान वाटते. हंगामानुसार रोगराई, बाजारभाव यावर आर्थिक गणिते अवलंबून असली तरीही या पिकाला चांगला नफा मिळत आहे. - कल्पना शरद पाटील, शेतकरी
अधिक वाचा: जम्मू काश्मीरचं सफरचंद पिकतंय कोल्हापूरच्या मातीत; यळगूडचे शेतकरी अनिल यांचा प्रयोग यशस्वी