मोहन मोहिते
वांगी : दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि बाजारभावातील चढ-उतारामुळे पारंपरिक शेती संकटात सापडत असताना वांगी (ता. कडेगाव) येथील उपक्रमशील शेतकरी राजाराम कदम यांनी नवीन प्रयोग केला आहे.
थेट जपानमधील जगप्रसिद्ध मियाझाकी आंबा आपल्या शिवारात फुलवून दाखवला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.
राजाराम भैरू कदम यांची वांगी येथे १५ एकर आंब्याची बाग आहे. पारंपरिक शेतीत वाढती अनिश्चितता पाहता त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला.
जगातील सर्वांत महागडा मानला जाणारा आणि जपानमध्ये अडीच लाख रुपये किलोपर्यंत दर मिळणारा मियाझाकी आंबा आपल्या शेतात पिकवण्याचा निर्धार त्यांनी केला.
या प्रयोगासाठी त्यांनी २०२३ मध्ये पश्चिम बंगाल येथून मियाझाकी आंब्याची ५० रोपे खरेदी केली. ही रोपे आणताना विमान, रेल्वे आणि रस्त्याने प्रवास करत त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक त्यांची वाहतूक केली.
गावाकडच्या वातावरणात ही विदेशी रोपे टिकतील का, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, राजाराम कदम यांनी जिद्द आणि सातत्याच्या जोरावर तीन वर्षे या झाडांची मेहनतीने निगा राखली.
उन्हाळा, पाऊस आणि थंडी अशा सर्व परिस्थितीत झाडांची विशेष काळजी घेत अखेर त्यांनी यश मिळवले.
त्यांच्या बागेत सध्या सुमारे २० किलो मियाझाकी आंब्याचे उत्पादन झाले असून लालसर रंग, आकर्षक स्वरूप, सुगंध आणि गोडव्यामुळे हा आंबा पाहणाऱ्यांनाही भुरळ घालत आहे.
काही दिवसांत आंबा विक्रीसाठी येणार
◼️ काही दिवसांत जपानमधील जगप्रसिद्ध मियाझाकी आंबा बाजारात विक्रीसाठी येणार असून परिसरातील शेतकरी व ग्राहकांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
◼️ राजाराम कदम यांच्या या प्रयोगामुळे वांगीच्या मातीतही जागतिक दर्जाची शेती शक्य असल्याचा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
अधिक वाचा: पुरंदर विमानतळासाठी जमिनी न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय; नक्की शेतकऱ्यांची काय आहे मागणी?
Web Summary : Sangli farmer Rajaram Kadam successfully cultivates the Miyazaki mango, known as the world's most expensive variety, in his field. He imported saplings from West Bengal, overcoming challenges and inspiring local farmers with his innovative agricultural experiment.
Web Summary : सांगली के किसान राजाराम कदम ने अपने खेत में दुनिया का सबसे महंगा मियाज़ाकी आम सफलतापूर्वक उगाया। उन्होंने पश्चिम बंगाल से पौधे आयात किए, चुनौतियों पर काबू पाया और अपने नवीन कृषि प्रयोग से स्थानीय किसानों को प्रेरित किया।