नितीन पाटील
बोरगाव: क्षारपड जमिनीवर ksharpad jamin सच्छिद्र निचरा प्रणाली उभारून बोरगाव (ता. वाळवा) येथील सलगर कुटुंबाने ९ एकर शेती क्षेत्राचा कायापालट करून शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श घालून दिला आहे.
ज्या शेतीत फक्त काटे बाभळ उगवायची त्याच शेतीत ६ इंचांपर्यंत मीठ फुटले होते. ज्या शेतात साधे तणही उगवत नव्हते. त्याच शेतातून एकरी ८२ टन व गुंठ्याला २ टनाचा उतारा पाडून क्रांती करून दाखवली आहे.
बोरगाव शिवारातील खाराओढा सलगर मळ्यात धोंडीराम सलगर, तानाजी सलगर, बाबासाहेब सलगर या तीन भावांसह परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती क्षारपडीमुळे नापीक व बंजर बनली आहे.
परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात व सोबत घेऊन माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून सर्व क्षारपड शेती सच्छिद्र निचरा प्रणालीद्वारे पिकविण्यास योग्य करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला.
शासनाकडून निराशाजनक अपयश आले. पण त्याने सलगर बंधूंनी हार मानली नाही. त्यांनी त्यांच्या शेतीत दोन फुटांनी तांबडी माती भरून वेगवेगळी पिके पिकवण्याचा प्रयत्न केला. यातही त्यांना अपयश आले.
अखेरीस स्वखर्चातून सच्छिद्र निचरा प्रकल्प उभारण्याचा ध्यास घेतला व ९ एकर क्षेत्रावर ६ इंची पीव्हीसी लाइन, ४ इंची सच्छिद्रचे पाइप संपूर्ण क्षेत्रावर उभ्या आडव्या, समोर व बाजूस टाकले.
त्यानंतर त्यातील क्षारयुक्त पाणी मेन लाइनमधून २ हजार फूट लांब तीन चेंबरद्वारे खाऱ्या ओढ्यात नेऊन सोडले आहे. यासाठी ६ लाख रूपये खिशातून खर्च केले.
यात सलगर बंधूंना यश आल्याचे लक्षात येताच त्यांनी या क्षेत्रात शाळू, हरभरा पिके घेण्यास सुरुवात केली. हा प्रयोगही यशस्वी झाला. नंतर ढेलची, ताग हे पीक घेऊन जमिनीचा पोत वाढवला.
त्यानंतर दोन वर्षांनी उसाची लावण केली. आता याच जमिनीतून सलगर बंधूंनी गुंठ्याला २ टन तर एकरी ८२ टनांचा उतारा घेतल्याने त्यांच्या अनेक दिवसांच्या संघर्षाला यश आले आहे.
यासाठी त्यांना अभियंता बी. जी. पाटील व कृषी संशोधक बी. ए. चौगुले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सलगर बंधूंच्या या यशाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
परिसरातील शेतकऱ्यांची आजही शेकडो एकर जमीन क्षेत्र क्षारपड युक्त आहे. शासनाच्या मदतीची वाट पाहण्यापेक्षा स्वखर्चाने सच्छिद्र प्रकल्प उभारले तर चार वर्षांत त्यासाठी येणारा खर्च निघत आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी असा प्रकल्प उभारण्यासाठी कंबर कसली तर पुढच्या दोन पिढ्यांसाठी नापीक जमीन पिकाऊ बनेल. - डॉ. सतीश सलगर