दीपक माळी
माडग्याळ : संख (ता जत) गावातील डॉक्टर असलेले भाऊसाहेब पवार यांनी drumstick farming शेवग्याच्या शेंगांच्या पिकातून अनोखी समृद्धी प्राप्त केली आहे.
येथील शेतकरी आजही तोट्यात असलेल्या पारंपरिक ज्वारी, बाजरी शेतीवरच जगतो आहे. संख गावातील उच्चशिक्षित शेतकरी डॉ. पवार हे वयाच्या ७७ व्या वर्षी चाळीस एकर शेतीचे व्यवस्थापन करत आहेत.
३० एकरात शेवग्याची लागवड केली आहे. सध्या शेवग्याला प्रतिकिलो सरासरी १८५ ते १९० भाव मिळत असून आत्तापर्यंत दोन वेळा काढणीमधून आठ टनाचे उत्पादन मिळत आहे. डॉ. भाऊसाहेब पवार हे मूळ आसंगी तुर्क येथील रहिवासी, १९८३ मध्ये त्यांनी संख येथे वैद्यकीय सेवा सुरू केली.
शेतीची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संख येथेच जमीन खरेदी करून शेती करण्याचा प्रवास सुरू केला. आज पवार यांच्याकडे ४० एकर शेती आहे. त्यातील पाच एकर द्राक्ष बाग तर इतर सर्व जमिनीत शेवग्याची लागवड केली आहे.
आर्थिक सुबत्ता असूनही आणि दोन्ही मुले उच्चशिक्षित डॉक्टर असतानाही डॉ. पवार हे वयाच्या ७७ व्या वर्षातही एकही दिवस विश्रांती न घेता शेतात जाऊ कामाचे व्यवस्थापनात व्यस्त आहेत.
त्यांच्या शेतातील शेवग्याला चांगला बाजारभाव मिळत असून व्यापारी जागेवर येऊन शेवगा खरेदी करत आहेत. वेगवेगळ्या भागात निर्यात करीत आहेत. गेल्या वर्षी डॉ. पवार यांनी याच बागेतून ४२५ टन शेवग्याचे उत्पादन घेतले होते.
यंदा हा आकडा वाढेल असा विश्वास पवार यांना आहे. डॉ. पवार यांची प्रगतशील शेतकरी अशी ओळख जत तालुक्यात झाली असून त्यांची शेती पाहण्यासाठी गुजरात, कर्नाटक येथून शेतकरी येत आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अधुनिक शेतीचे धडे देत असल्याचे दिसत आहे.
डाळिंब काढून शेवगा लागवड
डॉ. भाऊसाहेब पवार यांनी सुरुवातीस डाळिंब लागवड केली होती. त्यापासून चांगले उत्पन्नही मिळविले. मात्र वारंवार हवामानातील बदल व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे त्यांनी सर्व डाळिंब काढून शेवगा लागवड केली आहे. चार वर्षात शेवगाच्या उत्पन्नातून डॉ. पवार हे समाधानी आहेत.
उच्चशिक्षित पवार कुटुंब
- डॉ. पवार यांनी वैद्यकीय सेवा थांबवत शेती करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित आहे.
- त्यांचे जेष्ठ चिरंजीव डॉ. शरद पवार व सून प्रिया यांचे जत येथे रुग्णालय आहे.
- भारत पवार हे अस्थिरोग तज्ज्ञा, त्यांच्या पत्नी स्नेहल या स्त्रीरोगतज्ज्ञा म्हणून मिरज येथे हॉस्पिटल चालवितात.
- एक मुलगी डॉ. स्मिता दरेकर या टिळक मेडिकल कॉलेज मुंबई येथे प्राध्यापक आहेत.
- तर दुसरी मुलगी डॉ. सुजाता सावंत या परभणी कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत.
अधिक वाचा: दुष्काळी जत तालुक्यात शेतकरी शशिकांत यांची कोटींनी कमाई देणारी भाजीपाला शेती; वाचा सविस्तर