Join us

रिक्षाव्यवसाय करत लागली शेतीची गोडी; शेतकरी संतोष करतायत फायद्याची भाजीपाला शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:51 IST

Farmer Success Story रिक्षाव्यवसाय करताना, पावसाळ्यातील कमी उत्पन्नामुळे ओढाताण करावी लागत असे. त्यामुळे दापोली तालुक्यातील कादिवली (गावठाणवाडी) येथील संतोष श्रीपत मांडवकर यांनी प्रगतशील शेतकरी महाजनकाका यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळ्यात भाजीपाला लागवड केली.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : रिक्षाव्यवसाय करताना, पावसाळ्यातील कमी उत्पन्नामुळे ओढाताण करावी लागत असे. त्यामुळे दापोली तालुक्यातील कादिवली (गावठाणवाडी) येथील संतोष श्रीपत मांडवकर यांनी प्रगतशील शेतकरी महाजनकाका यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळ्यात भाजीपाला लागवड केली.

पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शेतीमध्येच लक्ष केंद्रित केले. २००७ साली त्यांनी शेतीला प्रारंभ केला तेव्हापासून त्यांनी उत्तरोत्तर प्रगती केली आहे.

सुरुवातीला संतोष यांनी भेंडीची लागवड केली होती. त्यातून चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला. एकच पीक न लावता, आठ ते नऊ प्रकारची पिके लावली, तर विक्रीलाही सुलभ होते.

ग्राहकांनाही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या भाज्या मिळाल्या, तर त्यांनाही समाधान मिळते. हाच धागा पकडून पावसाळ्यात काकडी, चिबूड, भेंडी, दोडका, पडवळ, दुधी भोपळा, लाल भोपळा तसेच भात व नाचणीची लागवड सुरू केली.

संतोष यांना त्यांच्या पत्नी साक्षी यांची साथ मिळाल्याने विक्री सुलभ झाली. संतोष लागवडीपासून काढणीपर्यंतची सर्व जबाबदारी सांभाळतात, तर साक्षी यांनी विक्रीची धुरा सांभाळली आहे.

पावसाळ्यात भात कापणीनंतर मुळा, माठ, मेथी, मोहरी, पालक, चवळी या पालेभाज्या तसेच कलिंगड, भेंडी, काकडी, टोमॅटो, पावटा, वांगी, मिरची, कुळीथ लागवड करून उत्पादन घेत आहेत.

सेंद्रिय खतांचा सर्वाधिक वापर करीत असल्यामुळे शेतमालाचा दर्जा व उत्पादन चांगले मिळत असून, विक्रीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. टप्प्याटप्प्याने भाज्या विक्रीला पाठवता येतील, या पद्धतीने नियोजन करून लागवड करत आहेत.

२१ टन भोपळा उत्पादनगतवर्षी पावसाळ्यात दहा एकर क्षेत्रावर सुभाष यांनी भोपळा लागवड केली होती. १२० टन उत्पादन अपेक्षित होते. मात्र, पाऊस, वारा यामुळे पिकाचे नुकसान झाले. संतोष यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे २१ टन उत्पादन मिळण्यात यश आले. पिकासाठी केलेला खर्च निघाला असल्याचे त्यांना समाधान आहे. नैसर्गिक स्थित्यंत्तरामुळे पिकावर परिणाम झाला असला तरी न डगमगता संतोष खंबीर राहिले आहेत.

कलिंगड लागवडमांडवकर यांनी कलिंगडाची तीन टप्प्यात लागवड केली आहे. एका टप्प्यात तीन टन कलिंगड उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. १० ते १५ टन कलिंगड उत्पादनासाठी लागवड केली आहे. शिमग्यात कलिंगडाचा खप चांगला होतो. त्याष्टीने नियोजन करून लागवड केली आहे. स्थानिक बाजारातच कलिंगडाचा चांगला खप होतो. स्वतः विक्री करत असल्यामुळे दरही चांगला मिळत असल्याचे मांडवकर यांनी सांगितले.

महाजन काका यांच्याकडून प्रेरणा घेत शेती सुरू केली. मात्र, गेल्या १५- १६ वर्षात शेतीचे क्षेत्रच नव्हे तर उत्पादनाचा विस्तारही वाढला आहे. अनुभवातून शिकता आले. शेती, दर्जा व उत्पादन यामुळे २०१४ साली आदर्श शेतकरी म्हणून दापोलीतील एका संस्थेकडून सन्मानित करण्यात आले. शेतीशी संलग्न शेळीपालन व दुग्धोत्पादन करीत असताना, सेंद्रिय खते तयार करून शेतीसाठी वापरत आहे. वर्षभर विविध पिके घेण्यासाठी योग्य नियोजन करत असून, टप्प्या-टप्प्याने भाजीपाला तसेच तत्सम शेतमाल विकता येईल का, याचा अभ्यास करून लागवड करीत असून, त्यामध्ये यश आले आहे. - संतोष श्रीपत मांडवकर, कादिवली (गावठणवाडी)

टॅग्स :शेतकरीभाज्याशेतीपीकसेंद्रिय शेतीकोकणरत्नागिरी