संदीप अंकलकोटे
लातूर जिल्ह्याच्या झरी बु. (ता. चाकूर) येथील प्रगतिशील शेतकरी रामचंद्र संग्राम शेटकर यांनी आधुनिक शेतीची कास धरत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कारखान्याकडून होणाऱ्या उसाच्या विलंबावर मात करत त्यांनी करण्यासाठी स्वतःचा गूळ उद्योग सुरू केला असून, सर्व खर्च वजा जाता त्यांना एका एकरातून १ लाख ते १.५ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे.
सध्या चाकूर तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, साखर कारखाने वेळेवर ऊस घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांना उसाच्या वजनात आणि पैशात मोठा तोटा सहन करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून शेटकर यांनी स्वतःच ऊस गाळप करण्याचा निर्णय घेतला. शेटकर यांनी डिसेंबर २०२४ मध्ये १२ एकरांत उसाची लागवड केली.
सध्या एका एकरात ४५ टन ऊस निघत असून, कारखान्याला ऊस घातला तर अडीच ते तीन हजार रुपये भाव मिळतो. मात्र प्रक्रिया केल्याने बाजारभावाप्रमाणे १२ हजार ते १४ हजार रुपयांचा गूळ निघतो.
एकरी ५० हजार रुपये खर्च वजा जाता सरासरी एक ते दीड लाख रुपयांचा गूळ उत्पादनातून फायदा होत आहे. उत्पादित केलेला गूळ लातूरच्या अहमदपूर, तसेच परिसरातील, जालना येथील मार्केटमध्ये विक्री होत आहे. तसेच काही व्यापारी स्वतः येऊन घेऊन जात आहेत.
शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीचा अवलंब केल्यास फायदा...
शेतकऱ्यांनी केवळ कारखान्यावर अवलंबून न राहता, स्वतः उसाचे गाळप करून गुळासारखे प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. आधुनिक पद्धतीने शेती आणि प्रक्रिया केल्यास शेतकरी नक्कीच फायद्यात राहतील असे झरी-बु. येथील प्रगतिशील शेतकरी रामचंद्र शेटकर यांनी सांगितले.
