Join us

Success Story : आडुळे कुटुंबाचा प्रयोग आला फळाला; शेतकरी ते ग्राहक विक्रीचा दिला धडा गावाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:29 IST

Farmer Success Story : हलक्या, मुरमाड जमिनीत योग्य पिकाची निवड करून शाश्वत शेती करता येते, याचा आदर्श नमुना म्हणजे मंगरुळपीर तालुक्यातील मौजे चांभई येथील शेतकरी आनंदा आडुळे यांनी घालून दिला आहे.

गोपाल माचलकर 

हलक्या, मुरमाड जमिनीत योग्य पिकाची निवड करून शाश्वत शेती करता येते, याचा आदर्श नमुना म्हणजे वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील मौजे चांभई येथील शेतकरी आनंदा आडुळे यांनी घालून दिला आहे.

त्यांनी २ एकर मुरमाड जमिनीत काश्मिरी ॲपल बोर लागवड करून किफायतशीर शेती उभारली आहे. जून २०२१ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत त्यांनी फळबागेची लागवड केली. लागवडीसाठी रोपे त्यांनी पश्चिम बंगालहून आणली. त्यानंतर १० बाय १० फूट अंतरावर ८०० झाडांची लागवड केली.

पहिल्या वर्षी समाधानकारक उत्पादन मिळाल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांना २ लाखांचे उत्पन्न मिळाले. यावर्षी त्यांनी १०० क्विंटल उत्पादन घेतले असून, सरासरी ३५ रुपये प्रतिकिलो दराने त्यांना ३.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातील १ लाख रुपये उत्पादन खर्च वजा जाता त्यांना २.५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.

लागवड ते विक्री पर्यंत सर्व कामांकारिता शेतीमध्ये आडुळे कुटुंबातील मुलगा अरूण आडुळे व सून कविता आडुळे राबत असतात. या व्यतिरिक्त गावातील महिलांना ही त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. या सर्व प्रवासादरम्यान त्यांना कृषि विभाग मंगरुळपीर येथील कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत असते.

जमिनीच्या पोतानुसार योग्य पिकाची निवड !

जमिनीच्या पोतानुसार योग्य पिकाची निवड करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येते. फक्त सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन हिम्मत न हरता प्रत्येक अडथळ्याला सामोरे जावे लागते. शेवटी विजय आपलाच असतो, असे मत प्रयोगशील शेतकरी आनंदा आडुळे यांनी व्यक्त केले आहे.

जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची निवड, उत्पादन खर्च कमी करणे व विक्री नियोजन कसे करावे, याचा आदर्श परिपाठ आडुळे यांनी इतर शेतकऱ्यांसाठी निर्माण केला आहे. - सचिन कांबळे, तालुका कृषी अधिकारी, मंगरुळपीर.

'थेट उत्पादक ते ग्राहक विक्री' यामध्ये सक्रिय सहभाग

• मंगरुळपीर तालुक्यातील मौजे चांभई येथील शेतकरी आनंदा आडुळे यांना या प्रवासात त्यांना कृषी विभाग, मंगरूळपीर येथील कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.

• कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावे व थेट उत्पादक ते ग्राहक विक्री यामध्ये सक्रिय सहभाग घेतात.

• त्यांची उत्पादने मंगरुळपीर व करंजा बाजारपेठेत विकली जातात.

हेही वाचा : वाटाणा पिकांत 'मल्चिंग'चा वापर; केशवरावांचा प्रयोग चर्चेचा विषय

टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेतीफळेवाशिमविदर्भशेतकरीशेती क्षेत्रबाजार