नवनाथ जगदाळेदहिवडी : आंधळी, ता. माण येथील अशोक जोतीराम शेंडे आणि त्यांचे बंधू किसन शेंडे या बंधूंनी विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीची चक्क दुष्काळी भागात लागवड केली.
तसेच फळे आणून काहीच अशक्य नाही हेही दाखवून दिले. त्यांनी दोन एकर संत्रीच्या बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांपुढे त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
आंधळीच्या शेंडे बंधूंनी यापूर्वी वसई केळीचे भरघोस उत्पन्न घेऊन ती इराणलाही पाठवली होती. आजही त्यांची देशी केळी बाजारपेठेत उपलब्ध आहे.
चार वर्षांपूर्वी त्यांनी अहिल्यानगरमधून संत्रीची रोपे घेतली. त्यानंतर दोन एकर क्षेत्रामध्ये दहा फूट बाय बारा फूट अंतर ठेवून संत्रीची ६५० झाडे लावली.
त्यानंतर दोन वर्षे आंतरपीक म्हणून त्यामध्ये कांदा, सोयाबीन, भुईमूग पीक घेतले. यामुळे बागेचा खर्च वरचेवर निघाला. तर यावर्षी त्यांनी संत्रीच्या प्रत्येक झाडामागे किमान सहा क्रेट माल काढला.
पुणे येथील बाजारपेठेत किलोला ५० ते १०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. फळबागेला डाळिंबासारखी फवारणी करावी लागत नाही. त्यांनी विक्रमी असे उत्पादन घेऊन लाखो रुपये मिळवले आहेत.
आमच्या आंधळीमध्ये जिहे-कटापूर योजनेचे पाणी आले आहे. याचा फायदा म्हणून आम्ही डाळिंबाचा विचार न करता संत्रीची बाग लावली. आज या बागेला कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न मिळाले आहे. यापुढेही तालुक्यात डाळिंब बागेला पर्याय म्हणून संत्र्याची लागवड झाल्यास त्यांना मदत करण्यास तयार आहोत. - अशोक शेंडे, शेतकरी, आंधळी
अधिक वाचा: काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न