Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुभेदार दत्ताराम घाडगे देशसेवेनंतर करत आहेत मातीची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 12:19 IST

देशाची प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्तीनंतर खेड तालुक्यातील वेरळ येथील सुभेदार दत्ताराम घाडगे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बारमाही शेतीतून उत्पन्न मिळवत असतानाच विक्रमी उत्पन्न मिळविण्यासाठी शेतामध्ये विविध प्रयोग करीत आहेत.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : देशाची प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्तीनंतर खेड तालुक्यातील वेरळ येथील सुभेदार दत्ताराम घाडगे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. सुभेदार दत्ताराम यांची पत्नी अनिता सुरुवातीपासून शेती करत असत. निवृत्तीनंतर पतीची साथ मिळाल्यानंतर दोघांनी मिळून नारळ, सुपारी, चिकू, पपई, शेवगा लागवड केली असून, मोकळ्या जागेत नाचणी, वरी, तूर, हळद, भाजीपाला लागवडीतून उत्पन्न मिळवत आहेत. शिवाय शेतीला पूरक म्हणून दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत.

दत्ताराम व अनिता या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मुलगा इंजिनिअर असून, मुलगी नर्स आहे. दोघांचीही लग्न झाली आहेत. दत्ताराम घाडगे देशसेवा बजावत असताना अनिता वडिलोपार्जित जमिनीत शेती करत असत. खरीप हंगामात भात, नाचणी वरी, हळद तर रब्बीमध्ये भाजीपाला, तूर, भूईमूग लागवड करून उत्पादन घेत असत. निवृत्तीनंतर दत्ताराम यांनी पत्नीला साथ देण्यासाठी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे.

कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान पौष्टिक तृणधान्य पीक लागवड योजनेअंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामात त्यांनी नाचणी लागवड केली होती. त्यासाठी 'सीएफएमव्ही ३ इ. के. विजय' या वाणाची निवड केली होती. या वाणाची त्यांनी साडेतीन गुंठे क्षेत्रावर ठोंबा पद्धतीने लागवड केली होती. जूनमध्ये त्यांनी फोकून नाचणी पिकांची पेरणी केली व पेरणीपूर्वी शेतीची नांगरट करताना त्यांनी ८० किलो शेणखताचा वापर केला होता. तसेच रोपवाटिकेत ३ किलो युरिया खताची मात्रा दिली होती. रोपे लावणीसाठी तयार झाल्यानंतर ३० दिवसांची रोपे एका ठोंब्यात दोन याप्रमाणे दोन ओळीत २० सेंमी व दोन रोपात १५ सेंमी अंतर ठेवून लावणी केली होती.

लावणीवेळी ठोंब्यातून सुफला, युरिया खताची मात्रा दिली होती. नत्र खताचा दुसरा हप्ता लावणीनंतर दिला. पिकाची एकदा पेरणी केली. पीक तयार झाल्यानंतर नाचणीची कणसे कापून उन्हात वाळवली व नंतर काठीने त्याची मळणी केली. तेव्हा त्यांना साडे तीन गुंठे क्षेत्रापासून १४२ किलो इतके भरघोस उत्पन्न मिळाले. गतवर्षी त्यांना १२० किलो नाचणीचे उत्पन्न मिळाले होते. वाण बदल केल्यामुळे उत्पन्नात २२ किलोची वाढ झाली आहे. (हेक्टरी ४०.५७ किलो हेक्टरी ४० उत्पादन आले म्हणजेच हेक्टर ६ क्विंटलने वाढ झाली). बारमाही शेतीतून उत्पन्न मिळवत असतानाच विक्रमी उत्पन्न मिळविण्यासाठी शेतामध्ये विविध प्रयोग करीत आहेत. घाडगे दाम्पत्यांला शेती कामासाठी उच्चशिक्षित मुलांचीही मदत मिळत आहे. 

बागायतीत आंतरपिकेआंबा, नारळ, सुपारी, चिकू, पपईची लागवड केली असून बागायतींमध्ये आंतरपिके घेत आहेत. खरीप हंगामात भात, नाचणी, वरी, तूर, हळद तर रब्बी हंगामात भूईमूग, वांगी, गवार, मिरची, पालेभाज्या, टोमॅटो, कोथिंबीर लागवड करून उत्पादन घेत आहेत. शेतीला पूरक दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला असून त्यामधून उत्पन्न मिळवत आहेत. शेतीसाठी कंपोस्ट खताचा वापर करता यावा यासाठी गावठी गाय घेतली असून दररोज सहा लिटर दूध त्यांना मिळत आहे.

यांत्रिक अवजाराचा वापरखरीप हंगामातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. रब्बीतील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे. शेतीसाठी घाडगे कुटुंबीयांनी बोअरवेल खोदली आहे. नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. गवत काढणीसाठी ग्रासकटर तर कीटकनाशक फवारणीसाठी स्प्रेअर पंपाचा वापर करत आहेत. यांत्रिक अवजारांमुळे कामामध्ये वेळेची, श्रमाची व पैशाची बचत होत असल्याचे सिद्ध केले आहे. यांत्रिक अवजारासह लागवडीसाठीही नवीन तंत्राचा अवलंब करत आहेत. उत्पादकता वाढीसाठी सतत प्रयत्नशील आहेत.

गांडूळ खतासाठी प्रयत्नशेतीचा दर्जा व उत्पन्न वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करत आहेत. शेण, बागायतीतील पालापाचोळा कुजवून कंपोस्ट खत तयार करून त्याचा वापर शेतीसाठी करत आहे. रासायनिक खताचा वापर मर्यादित केला जात आहे. गांडूळखत युनिट सुरू करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात १०० टक्क्के सेंद्रिय शेती करण्याचा घाडगे कुटुंबांचा उद्देश आहे. सेंद्रिय शेतमालास चांगली मागणी असून त्यातून विक्रमी उत्पन्न मिळत आहे.

शेतमालाची विक्रीवांगी, गवार, हिरवी मिरची, टोमॅटो, पालेभाज्या, कोथिंबीरसह हळद, वरी, नाचणीची विक्री सुलभ होत आहे. शेतातील ओला चारा गायीसाठी दिला जात असल्यामुळे दुधाचा दर्जा व प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे दूध विक्रीतून उत्पन्न मिळते. त्यांनी कोंबड्याही पाळल्या आहेत. पक्षी, विष्ठा, अंडी विकूनही उत्पन्न मिळते. विष्ठेपासून खत तयार केले जात असल्याने विष्ठेला चांगली मागणी होते. शेती व पूरक व्यवसायातून उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे.

टॅग्स :शेतकरीसंरक्षण विभागशेतीनाचणीभाज्यापीकरत्नागिरी