अनिल भंडारी
बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील किशोर सिद्धेश्वर वडचकर या शेतकऱ्याने कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मेहनत करून ७० गुंठयात दहा लाखांचे उत्पन्न मिळवत प्रगती साधली आहे.
रेशीम शेतीने या कुटुंबाच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. किशोर यांनी पोखरा अंतर्गत ०.७० हेक्टरात तुती लागवड केली. त्यांचे २०२४-२५चे कोष उत्पादन १५१२.३ किलो आले. १५२ किलो डागी डबल पोचट किलो उत्पन्न झाले आहे.
चांगल्या मालाचे एकूण उत्पन्न ८ लाख ४१ हजार २१९ रुपये झाले आहे. आतापर्यंत एकूण आठ बॅच झाल्या आहेत. कमीत कमी ४७० जास्तीत जास्त ७३० रुपये भाव मिळाला.
सरासरी ५५० रुपये भाव मिळाला आहे. येणाऱ्या बॅचमध्ये उर्वरित उत्पन्न निघून लवकरच दहा लाखांचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचा विश्वास किशोर यांनी व्यक्त केला.
कुटुंबच करतात व्यवस्थापन
• सुरुवातीला ३ लाख रुपये खर्च करून २६ बाय ७२ आकाराचे शेड किशोर यांनी तयार केले.
• वार्षिक साधारणतः दोन लाख रुपये इतर खर्च या शेतीवर करतात.
• स्वतः किशोर, त्यांची पत्नी राणी, आई सुनंदा आणि वडील सिद्धेश्वर हे या रेशीम शेतीचे व्यवस्थापन सातत्याने सांभाळतात.
अवर्षणाच्या फेऱ्यात रेशीमची साथ
• किशोर वडचकर हे शेतात ऊस, सोयाबीन, गहू, ज्वारीचे पीक घेतात. यंदा खरीप हंगामात त्यांची पेरणी बाकी आहे.
• एकीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे कुप्पा परिसरात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके सलाइनवर आहेत. अशा परिस्थितीत किशोर यांना रेशीम शेतीने चांगली साथ दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी आदर्श
शेतकऱ्यांनी नव्या मार्गान मेहनत घेऊन उत्पन्न घेतल्यास नक्की यश मिळते, हे किशोर वडचकर यांच्या मेहनतीवरून दिसून येते. नवरा, बायको अन् आई, वडील या दोन जोड्यांनी घेतलेल्या मेहनतीतून ते दशलक्षपती बनले आहेत. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा. - धनंजय गुंदेकर, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड.