Join us
Daily Top 2Weekly Top 5

Success story: बाजारातील अचूक वेळ साधत सखाराम यांनी केली काकडीची शेती.. वाचा किती मिळाला नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:52 IST

Farmer Success story ३० गुंठे क्षेत्रात काकडी पिकाची (cucumber) लागवड करून मंचर, थोरातमळा येथील शेतकरी सखाराम विठोबा थोरात यांनी कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारे उत्पादन कसे काढता येते याचा आदर्श सभोवतालच्या परिसरामध्ये दाखवून दिला आहे.

मंचर : ३० गुंठे क्षेत्रात काकडी पिकाची लागवड (Farmer Success Story) करून थोरातमळा येथील शेतकरी सखाराम विठोबा थोरात यांनी कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारे उत्पादन कसे काढता येते याचा आदर्श सभोवतालच्या परिसरामध्ये दाखवून दिला आहे. त्यांनी नियंत्रित पद्धतीने शेती करून ३० गुंठ्यांत काकडीचे उत्पादन घेऊन लाखो रुपयांचे उत्पादन मिळवले आहे.

उन्हाळी हंगामाव्या शेवटी काकडीची आतक कमी असते. त्यामुळे वाढलेल्या दराची संधी साधण्यासाठी काकडीचे थेट बियाणे लावले तर उन्हामुळे उगवण्याचे प्रमाण कमी, तर मरतूक जास्त होते. यामुळे रोपांचा दर्जा चांगला पाहून योग्य असे रोपांची लागवड केल्यास उत्पादनवाढीस मदत होते असे थोरात म्हणाले.

पूर्वी सरी पद्धतीने पीक घेतले जायचे. आता ते बेडवर घेतले जाते. पिकाला पाणी भरपूर म्हणजे एकाआड एक दिवस लागते. या भागात बोअरवेल्स तसेच घोड नदी असल्याने पाण्याची सोय चांगली आहे.

मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे खुरपणीचा खर्च वाचतो, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. पिकाचा जोम काढतो. काकडीला तजेलदारपणा येतो. थोरात यांनी सुरुवातीला चांगली नांगरणी केली. सेंद्रिय खताचा वापर केला. त्यावर काकडीचे रोप एप्रिल महिन्यात लावले. नव्या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात काकडीची शेती फुलली. वेलीला जागोजागी काकड्याही लागल्यात.

काकडीची लागवड करताना कोंबडखत ६० बॅग आणि १०:२६:२६, सूक्ष्म अन्नद्रव्ये असा रासायनिक खताचा बेसल डोस टाकला. मल्चिंग पेपर वापरून लागवड केली. त्यामध्ये त्यांनी तार काठी वापरून चांगल्या प्रतीची काकडी उत्पादन घेतले.

वेळोवेळी बिरोबा शेती भांडारचे चालक नवनाथ थोरात यांच्या सल्ल्यानुसार कीटकनाशक बुरशीनाशक यांची फवारणी व ड्रीप खाांचा वापर करून भरघोस उत्पादन घेतले, काकडी विक्रीसाठी किसान कनेक्ट अॅग्रो मॉल कळंब येथे पाठवण्यात येत आहे.

२० किलो कॅरेटला सरासरी ७०० रुपये भाव मिळाला, काकडी तोडा चालू होऊन २० दिवस झाले आहेत. मशागत, बियाणे, खते, मल्चिंग पेपर आणि मजुरी मिळून साधारण ८० हजार रुपये खर्च झाला आहे. छोट्या पिकात बाजारभाव मिळाला आणि उत्कृष्ट दर्जेदार पीक आले तर चांगली कमाई होते या शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.

उन्हाळ्यात मे, जूनच्या दरम्यान सरासरी दर किलोला १२ ते १५ रुपये राहतोच, या वेळेस मात्र किलोला दर ३० ते ३५ रुपयांपर्यंतही मिळत आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अलीकडच्या काळात काकडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. - नीलेश थोरात, संचालक, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती

अधिक वाचा: उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा

टॅग्स :शेतकरीशेतीपीकभाज्याबाजारमंचरपीक व्यवस्थापन