चंद्रकांत गायकवाड
तिसगाव: ऊस, कापसासारख्या नगदी पिकांना खर्चाच्या तुलनेत न मिळणाऱ्या दराला कंटाळून ढवळेवाडी (ता. पाथर्डी) येथील पंढरीनाथ यादव माने यांनी दोन एकर केळी लागवड केली.
अतिवृष्टीमुळे पीक जोमदार येऊनही आर्थिक नियोजन कोलमडले. याही स्थितीला तोंड देत माने यांच्या मोनल व अनिता या दोन सुनांनी विक्रीसाठी पुढाकार घेत आठवडे व गुजरी बाजार गाठले.
कच्च्या केळीचे वेफर्स तयार करण्यास सुरुवात केली. त्यातून अपेक्षित नफा मिळत नसला, तरी उत्पादित मालाचे योग्य मोल होत आहे. ऊस पिकाच्या तुलनेत केळीचे पीक फायद्याचे ठरल्याचे माने कुटुंब सांगते.
ढवळेवाडी फाटा येथील राहत्या घराजवळील चिकणी मळा येथे माने यांनी दोन एकरावर ऑक्टोबर-२०२४ मध्ये केळीची २२०० रोपे सरी काढून पाच बाय पाच फुटांवर लावली.
तीन महिन्यांनी सरी फोडून पुनर्बांधणी केली. बेडवर शेणखत, मळी, कोंबडी खत सम प्रमाणात दिल्याने रोपे जोमात वाढली. ठिबक सिंचनाद्वारे दर महिन्याला विद्राव्य खते सोडली.
केळीला कमळ फुल उमलले, की पीक प्रगती सुरू होत असल्याचे सांगितले जाते. त्याप्रमाणे सात महिन्यांतच केळीचे रोपांना कमळ फुलले.
एका केळी रोपाला आठ ते नऊ फणी (नऊ डझन) ठेवत संख्या मर्यादित ठेवली. त्यामुळे वाढ जोमदार होऊन सप्टेंबरमध्ये तोडणी सुरू झाली. शिक्षित सुनांनी धावपळ करीत केलेल्या विक्री तंत्राने कौटुंबिक गोडवा वाढला आहे.
सव्वातीन लाखांचे उत्पन्न
◼️ एका केळी रोपाला ४० ते ५० किलो माल निघत आहे. ठोक विक्रीसाठी व्यापारी पाच रुपये किलो दर मागत असल्याने माने यांच्या सुनांनी थेट आठवडे व गुजरी बाजारांत केळी विक्री तंत्र अवलंबले.
◼️ हिरव्या कच्च्या केळीपासून वेफर्स बनविले जातात. दर कमी मिळूनही विक्री तंत्राने या कुटुंबाला जवळपास सव्वातीन लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळाले.
अधिक वाचा: कंबाईन हार्वेस्टरने हरभऱ्याची काढणी करायचीय? कोणता वाण पेराल? वाचा सविस्तर
