शेतकऱ्यांचे सोने करणारे फळपीक म्हणजे डाळिंब. मात्र अलीकडे नैसर्गिक संकटात डाळींबाचे उत्पादन घेणे म्हणजे मोठे कष्टाचे झाले आहे. ज्यामुळे मंगळणे येथील अशोक पांडुरंग सांगळे यांनी डाळिंब शेतीला फाटा देत, मोसंबी फळबागेत नैसर्गिक शेतीचा अनोखा यशस्वी प्रयोग केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मंगळणे (ता. नांदगाव) येथील अशोक पांडुरंग सांगळे यांनी आपल्या साडेसात एकर क्षेत्रावर न्यू शेलार आणि काटोल गोल्ड जातीच्या मोसंबीची प्रत्येकी ७५० झाडे लावली आहे. ज्यातून रसायन युक्त खते आणि द्रव्य रूप खतांचा वापर न करताही ते आज चांगले अपेक्षित उत्पन्न घेत आहे.
सांगळे यांनी बागेत कृषी विभाग नांदगाव आणि आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गोवर्धन नैसर्गिक गटाच्या सहकार्याने विविध जैविक निविष्ठांचा वापर केला आहे. तसेच शेतीचे व्यवस्थापन करत असताना, त्यांनी जैविक शेतीचा पद्धतशीर वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे.
त्याबरोबरच सांगळे मोसंबी बागेत तण नियंत्रणासाठी आधुनिक ग्रास कटरचा वापर करतात. ज्यामुळे मोसंबी उत्पादनाला अपेक्षेपेक्षा अधिक यश प्राप्त झाले आहे. जैविक खतांचा वापर, कुजलेले शेणखत, गांडूळ खत, विविध बुरशी अर्क आणि जिवाणूंचा वापर यामुळे त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
जैविक व्यवस्थापनामुळे त्यांच्या बागेत ५०० ग्रामहून जास्त वजन असलेली फळे येत आहेत आणि या सर्व प्रक्रियेत त्यांना न केवळ उत्तम उत्पादन मिळाले आहे तर जमिनीचे आरोग्यही उत्तम राखले गेले आहे.
डाळिंबाच्या तुलनेत मोसंबीचे उत्पादन कमी असले तरी, या शेतीत समाधान मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. कमी कष्ट, जैविक शेती आणि इतर अनेक निसर्गपूरक पद्धतींसह त्याचं व्यवस्थापन करत असताना मन तृप्त होणं, हेच त्यांचं मुख्य लक्ष्य आहे. - अशोक सांगळे.
