Join us

परिपूर्ण नियोजनाचा झाला फायदा; वादळात केळी आडवी पण काकडीने दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:19 IST

Farmer Success Story : जेव्हा नैसर्गिक आपत्ती केळीसारख्या पारंपरिक पिकांवर तडाखा घालते तेव्हा नवे प्रयोगच नव्या संधी घेऊन येतात हे दाखवून दिलंय देळूब बु. येथील तरुण शेतकरी अनिल गुंडले यांनी!

युनूस नदाफ

जेव्हा नैसर्गिक आपत्ती केळीसारख्या पारंपरिक पिकांवर तडाखा घालते तेव्हा नवे प्रयोगच नव्या संधी घेऊन येतात हे दाखवून दिलंय देळूब बु. येथील तरुण शेतकरी अनिल गुंडले यांनी!

गेल्या पाच दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन घड काढणीच्या वेळेस झाडे पडल्याने नुकसान अधिकच वाढले. मात्र याच काळात अनिल गुंडले यांचे गुजराती गावरान काकडीचे पीक वाऱ्याच्या तडाख्यातून सुरक्षित राहिले. केवळ सुरक्षितच नव्हे तर या पिकाने त्यांना चांगला आर्थिक आधारही दिला.

त्यांच्या या यशस्वी प्रयोगातून हे स्पष्ट झाले की नवे पीक पद्धती आणि धोरणात्मक निर्णय हे संकटाच्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतात. तसेच शेतकऱ्यांनी केवळ मुख्य पिकाच्या आशेवर न राहता सोबतीस इतर पीक पद्धतींचा अवलंब करणे देखील गरजेचे आहे. 

आधुनिक पद्धतीने काकडीची यशस्वी लागवड

• अनिल गुंडले यांनी एक एकर क्षेत्रात गुजराती गावरान काकडीची लागवड केली.

• ज्यासाठी त्यांनी स्वतः नर्सरीत रोपे तयार केली आणि आठ बाय दीड फूट अंतरावर रोपांची लागवड केली.

• केवळ ५४ दिवसांत पहिली तोडणी सुरू झाली. मागील आठवड्यात पाच वेळा तोडणी झाली असून पहिल्याच टप्प्यात ५०,००० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

• अजून १५ ते २० तोडण्या होणार असल्याने दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

काकडीला बाजारात जबरदस्त मागणी

• ही गावरान काकडी खाण्यासाठी चविष्ट, आतून कडक आणि टिकाऊ असल्याने ग्राहकांमध्ये विशेष मागणी आहे.

बाजारात १८ ते २२ रुपये प्रतिकिलो ठोक भाव मिळत असून, दररोज काकडीची तोडणी सुरू आहे.

• आतापर्यंतच्या फक्त पाच तोडणीतच ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

• लग्न समारंभात सलाडसाठी तसेच घरगुती वापरासाठीही गृहिणी मोठ्या प्रमाणावर ही काकडी खरेदी करत आहेत.

हेही वाचा : ताडकळस येथील २२ वर्षीय पदवीधर तरुणाने भाजीपाला उत्पादनातून मिळविले नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीनांदेडनांदेडमराठवाडाशेतकरी यशोगाथाबाजारपीक व्यवस्थापनकेळीपाऊस