गजानन पाटीलदरीबडची : जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी परिस्थितीशी दोन हात करत जिद्द व चिकाटीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत कुशल मार्गदर्शनाच्या जोरावर फळबागांबरोबरच भाजीपाला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद येथील दत्तात्रय रामचंद्र जगताप-पाटील या प्रगतशील शेतकऱ्यांनी एकरी ७७ टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले.
४२ रुपये किलो दर मिळाला.१५ लाखांचा नफा मिळाला आहे. दुष्काळी पट्ट्यात ढोबळी मिरचीने शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलले आहे.
कोंतेवबोबलाद येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय जगताप-पाटील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यात कायम आघाडीवर आहेत.
चार वर्षांपूर्वी रमेश जगताप, दत्तात्रय जगताप व बाबूराव डुबूल यांच्यासह सात ते आठ शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच ढोबळी मिरचीची लागवड केली. बाजारपेठेत भाव न मिळाल्याने तोटा झाला.
प्रयोग फसल्याने शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची नको म्हणत त्याकडे पाठ फिरवली. यावर्षी पुन्हा ढोबळी मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या तिन्ही शेतकऱ्यांनी ऐन उन्हाळ्यात ४२ अंश डिग्री तापमान असतानाही प्रत्येकी एक एकर ढोबळी मिरचीची लागण केली.
पाच फूट अंतरावर मल्चिंग पेपरचा बेड तयार केला. भोसे (ता. मिरज) येथील नर्सरीमधून रोपे खरेदी केली. एकरात १५ हजार रोपांची लागण केली.
औषधे व रासायनिक खतांची मात्रा वेळेवर दिली. सात महिन्यांत १८ तोडे झाले. एकरी ७७ टन उत्पादन मिळाले असून किलोला ४२ रुपये दर मिळाला.
मिरचीची व्यवस्थित पॅकिंग केली जाते. ढोबळी मिरची खरेदी व्यापारी शेतीच्या बांधावर येऊन करतात. जयपूर, दिल्ली, कोलकाता येथील बाजारपेठेत पाठवितात, मिरचीतून आतापर्यंत १५ लाखांचा नफा मिळाला.
जयपूर, कोलकाताच्या बाजारपेठेत पाठविली. दुसऱ्या प्रयत्नात विक्रमी उत्पन्न घेतले. या यशामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. येणाऱ्या काळात या भागात ढोबळी मिरचीसह अन्य भाजीपाल्याचे उत्पादन व उत्पन्न वाढणार, हे मात्र निश्चित.
गटशेती ठरली फायद्याचीयेणाऱ्या काळात शेतीतील मालाला भाव यायचा असेल तर गटशेती करणे काळाची गरज आहे. शेतकरी रमेश जगताप, दत्तात्रय जगताप व बाबूराव डुबूल या शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीची गट शेती केली. यावर्षी प्रत्येकी एक एकर ढोबळी मिरची लावली. गटशेतीचा प्रयोग केला व तो यशस्वी झाला.
शेतीत नवनवीन प्रयोग काळाची गरजआधुनिक शेतीकडे वळावे लागणार आहे. योग्य व्यवस्थापन, कष्ट व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. शेतीत येणाऱ्या काळात नवीन प्रयोग करणे काळाची गरज आहे, असे मत प्रगतशील शेतकरी दत्तात्रय जगताप-पाटील यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा: सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकाने हळद शेतीत केली कमाल; २० गुंठ्यांत काढले १५ क्विंटल उत्पादन