गजानन मोहोड
शेती हा केवळ पुरुषांचा व्यवसाय आहे, असा समाजातील जुना समज आज अनेक महिला आपल्या कर्तृत्वाने खोटा ठरवत आहेत.(Women Farmer Success Story)
चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव येथील भारती अरुणराव पोहोरकर या उच्चशिक्षित तरुणीनेही आपल्या जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे. (Women Farmer Success Story)
अवघ्या १ एकर ४ गुंठे क्षेत्रात संत्र्याची बाग उभारून त्यांनी तब्बल सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले, जे अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. (Women Farmer Success Story)
नोकरी सोडून शेतीचा धाडसी निर्णय
भारती पोहोरकर या पदव्युत्तर शिक्षित असून त्यांनी काही काळ अकाउंटंट म्हणून नोकरी केली होती. मात्र, घरच्या शेतीकडे लक्ष देताना त्यांना शेतीतील वाढता मजुरी खर्च आणि व्यवस्थापनातील अडचणी जाणवल्या.
शेतीत सुधारणा करून अधिक उत्पादन मिळवता येईल, या विश्वासाने त्यांनी नोकरीचा मार्ग सोडून पूर्णवेळ शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
आईसोबत शेतीची जबाबदारी स्वीकारत त्यांनी संत्र्याच्या बागेला अक्षरशः प्रयोगशाळेचे स्वरूप दिले. पाणी, खत आणि झाडांचे व्यवस्थापन याकडे त्यांनी अत्यंत बारकाईने लक्ष दिले.
पाण्याचे सूक्ष्म नियोजन
संत्रा पिकात पाण्याचे योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. भारती यांनी झाडांना मुळाशी थेट पाणी देण्याची पद्धत अवलंबली. बहर येण्याच्या काळातच झाडांना पाण्याचा ताण देऊन त्यांनी फळधारणा सुधारली.
तसेच वेळेवर छाटणी आणि अतिरिक्त फळांची विरळणी करून झाडांवरील भार कमी केला. त्यामुळे फळांचा आकार आणि दर्जा सुधारला व बाजारात चांगला भाव मिळू लागला.
'अल्टरनेट बेअरिंग' समस्येवर मात
संत्रा पिकात एक वर्ष भरपूर उत्पादन तर पुढील वर्षी कमी उत्पादन मिळण्याची 'अल्टरनेट बेअरिंग' ही समस्या मोठी मानली जाते. मात्र, भारती पोहोरकर यांनी झाडांच्या ऊर्जेचे संतुलन राखण्यावर भर दिला.
खतांच्या योग्य प्रमाणात विभागून दिलेल्या मात्रा, फळांची नियोजनबद्ध विरळणी आणि झाडांच्या आरोग्याचे सातत्याने निरीक्षण करून त्यांनी या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात केली.
निसर्ग आणि विज्ञानाची सांगड
कीड व रोग नियंत्रणासाठी भारती यांनी निसर्ग आणि विज्ञान यांचा सुंदर समन्वय साधला. संत्र्याच्या दोन ओळींमध्ये झेंडूची लागवड करून त्यांनी 'सूत्रकृमी' नियंत्रणाचा नैसर्गिक उपाय केला.
याशिवाय कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे आणि सौरऊर्जेवर चालणारे लाईट ट्रॅप्स बसवले.
झाडांच्या खोडांवर बोर्डो पेस्ट लावून आणि सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी बागेचे आरोग्य सुधारले.
या उपाययोजनांमुळे त्यांच्या संत्रा बागेचे उत्पादन ७ टनांवरून थेट १५ टनांपर्यंत वाढले.
पूरक व्यवसायातून वाढवले उत्पन्न
भारती पोहोरकर यांनी केवळ संत्रा उत्पादनावरच भर न देता पूरक व्यवसायातूनही उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण केले. संत्रा बागेत लावलेल्या झेंडूच्या फुलांची विक्री करून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते.
तसेच अंबाडी आणि इतर रानभाज्या उगवून त्या बाजारात विकतात. याशिवाय दुग्धव्यवसाय आणि गावरान अंडी उत्पादन यामुळेही त्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे.
कर्तृत्वाला मिळाला पुरस्कार
शेतीतील आधुनिक प्रयोग, उच्च उत्पादन आणि महिलांसाठी आदर्श ठरलेल्या कार्यामुळे २०२३ मध्ये त्यांना 'सर्वोत्कृष्ट तरुण महिला शेतकरी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अनेकांसाठी प्रेरणादायी वाटचाल
भारती पोहोरकर यांची यशोगाथा ही ग्रामीण भागातील तरुणांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पूरक व्यवसायाची जोड दिल्यास कमी क्षेत्रातूनही मोठे उत्पन्न मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
आज त्यांच्या संत्रा बागेत झाडांवर लटकणारी सोनसळी फळे ही केवळ उत्पन्नाचे साधन नाहीत, तर त्यांच्या संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वासाची चमकणारी माणिक-मोती ठरली आहेत.
