Farmer Women Success Story : पुणे शहरातील कर्वेनगर भागात राहणाऱ्या उज्वला करवळ यांनी कोरोना काळात आयटी प्राध्यापकाची नोकरी सोडत सुरू केलेल्या मसाल्याच्या व्यवसायाचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. ( Success Story)
या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी ४५ पेक्षा अधिक महिलांना स्वयंपूर्ण बनवलं असून ७ ते ८ महिलांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला आहे. केवळ एक हजार रूपयांपासून आणि एका खोलीतून सुरू झालेल्या या व्यवसायाची उलाढाल आता तब्बल ७० लाखांपर्यंत पोहोचली आहे.(Success Story)
उज्ज्वला या पेशाने आयटी प्रोफेसर म्हणून पुण्यातील नामवंत महाविद्यालयात काम करायच्या. पण आपलं स्वतःचं काहीतरी हवं या प्रेरणेतून त्यांनी नोकरी सोडून पीठे, मसाला व चटण्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला जवळच्या मैत्रिणींना या व्यवसायामध्ये सामील करून घेतलं आणि त्यानंतर एक एक करून महिला जोडत गेल्या.
केवळ एका खोलीतून हा व्यवसाय चालू असून यामध्ये डाळींचे पीठ, इडली - डोसा पीठ, मसाले, चटण्या, मिलेट्सचे वेगवेगळे पदार्थ असे मिळून जवळपास ७० पदार्थ बनवले जातात. घरगुती महिलांना बनवलेल्या उत्पादनांचा एक ब्रँड असावा म्हणून त्यांनी 'स्वाद' या ब्रँडची स्थापना करून हे पदार्थ विकायला सुरूवात केली.
या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत ७ ते ८ महिलांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला असून ४५ पेक्षा जास्त महिलांना व्यवसायात स्वयंपूर्ण बनवले आहे. कोरोना काळात त्यांनी एक हजार रूपयांपासून सुरू केलेल्या व्यवसायाने आता वटवृक्षाचं रूप धारण केलंय. या माध्यमातून महिला बचत गट आणि गरीब घरातील मुलींना आर्थिक हातभार लागताना दिसत आहे.
होम फ्रँचायझी मॉडेल
महिलांना थेट व्यवसायामध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांनी होम फ्रँचायझी मॉडेल विकसित केले आहे. या माध्यमातून त्यांनी बनवलेले उत्पादने विक्रीसाठी महिलांना प्रशिक्षण दिले जाते आणि दुकाने, प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्री केली जाते. विक्री करणाऱ्या प्रत्येक महिलेला त्यांचा वाटा मिळतो.
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून त्यांना ३ लाखांचे कर्ज मिळाले आणि त्यांच्या या व्यवसायाला चालना मिळाली. उत्पादनांच्या विक्रीतून त्या महिन्याकाठी ५ लाखांपेक्षा जास्त तर वर्षाकाठी ६० लाखांपेक्षा जास्त उलाढाल करतात.
"असा कोणताच व्यवसाय नाही जो आपण करू शकत नाही. आपण कितीही लहान असलो तरी आपले प्रयत्न प्रामाणिक पाहिजेत. प्रयत्न केल्यानंतर कोणतीच गोष्ट अश्यक्य नाही." असं उज्वला सांगतात. आयटी प्रोफेसर ते यशस्वी महिला उद्योजिका हा त्यांचा प्रवास इतर महिलांसाठी खरंच प्रेरणादायी आहे.