Strawberry Farming Success Story : सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्यात सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून चिखलीतील युवा शेतकरी व कृषी शिक्षण घेत असलेले पृथ्वीराज विलास चव्हाण यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आर्थिक पर्याय उभा केला आहे.(Strawberry Farming Success Story)
अवघ्या १० गुंठ्यांत घेतलेल्या भरघोस उत्पादनामुळे आणि थेट बाजारपेठेत मिळालेल्या चांगल्या दरामुळे हा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.(Strawberry Farming Success Story)
प्रतिकूल हवामान, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेती तोट्यात जात असतानाही, चिखली तालुक्यातील चव्हाण कुटुंबीयांनी शेतीशी आपली नाळ घट्ट ठेवली आहे.
याच कुटुंबातील पृथ्वीराज चव्हाण सध्या शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथे बी.एस्सी. (कृषी) तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असून, शिक्षणासोबत प्रत्यक्ष शेतीत नवे प्रयोग करण्याचा त्यांचा ध्यास आहे.
नाशिक भेटीतून सुचली कल्पना
पृथ्वीराजचे वडील विलास चव्हाण हे कांदा बियाणे उत्पादन क्षेत्रातील नावाजलेले उद्योजक आहेत. वडिलांसोबत नाशिक दौऱ्यावर असताना पृथ्वीराजची काही प्रगत स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी भेट झाली. त्या भेटीतूनच स्ट्रॉबेरी शेतीविषयी त्याला विशेष आकर्षण निर्माण झाले. कृषी शिक्षणाची पार्श्वभूमी असल्याने या पिकाचा अभ्यास करून चिखली परिसरात प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
स्वतः च केली रोपांची निर्मिती
पृथ्वीराजने बारामती येथे १० गुंठ्यांचा प्लॉट भाड्याने घेऊन स्वतःच्या मेहनतीने स्ट्रॉबेरी रोपांची निर्मिती केली. यासाठी सुमारे ६० हजार रुपयांचा खर्च आला. त्यानंतर मल्चिंग व ठिबक सिंचनाचा वापर करून रोपांची लागवड करण्यात आली. संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करण्यात आली असून, कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर करण्यात आलेला नाही.
दिवसाआड २५ ते ३० किलो उत्पादन
नोव्हेंबरच्या शेवटच्या व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीपासून सध्या दिवसाआड २५ ते ३० किलो उत्पादन मिळत आहे.
आतापर्यंत चार वेळा तोड झाली असून, मार्चपर्यंत उत्पादन सुरू राहण्याची शक्यता आहे. खर्च वजा जाता सुमारे तीन लाख रुपयांचा शुद्ध नफा अपेक्षित असल्याचे पृथ्वीराजने सांगितले.
उत्पादनापासून थेट विक्रीपर्यंत स्वतःचा सहभाग
या प्रयोगाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे रोपनिर्मितीपासून लागवड, संगोपन, तोडणी, आकर्षक पॅकिंग आणि थेट बाजारपेठेत विक्रीपर्यंत सर्व प्रक्रिया पृथ्वीराज स्वतः हाताळत आहे. सेंद्रिय आणि गुणवत्तापूर्ण स्ट्रॉबेरीला बाजारात चांगली मागणी असून, अपेक्षेपेक्षा अधिक दर मिळत आहेत.
शेतकऱ्यांसाठी नवी दिशा
सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरीसारख्या फळपिकाची यशस्वी लागवड होऊ शकते, हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. कमी क्षेत्रात, कमी कालावधीत आणि योग्य नियोजनाने शेती नफ्यात आणता येऊ शकते, असा संदेश हा प्रयोग देत असून, येत्या काळात रोपपुरवठा व मार्गदर्शनाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनाही या शेतीकडे वळवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
