- घनश्याम मशाखेत्री
गडचिरोली : केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीला उद्योगाची जोड दिल्यास आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबन साधता येते, हे माळंदा येथील प्रगतशील शेतकरी कृष्णा भागरथी भुरकुरिया यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन (पीएमएफएमई) योजनेचा लाभ घेत त्यांनी उभारलेला मसाले प्रक्रिया उद्योग आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
भुरकुरिया यांच्याकडे दोन हेक्टर वडिलोपार्जित शेती आहे. मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर करणे कठीण होत असल्याने पर्यायी उत्पन्नाचा मार्ग शोधण्याची गरज त्यांना जाणवत होती. सन २०२२- २३ मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने गावात बैठकीत कृषी सहायक पी. जी. मेश्राम यांनी 'पीएमएफएमई' योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याच मार्गदर्शनाने प्रेरित होऊन शेतीपूरक मसाले प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
कृषी सहायकांच्या तांत्रिक मार्गदर्शनासह जिल्हा संसाधन व्यक्तीशी (डीआरपी) संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत प्रकल्पासाठी कर्ज मंजूर झाले. सुमारे ९० हजार रुपयांच्या प्रकल्पात त्यांनी ८ हजार रुपये स्वतःचे भांडवल गुंतवले. फेब्रुवारी २०२३ पासून उत्पादन सुरू झाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मूल्यवर्धनावर भर देणे काळाची गरज आहे, असे सांगितले.
असे आहे मसाले युनिट
या युनिटमध्ये मिरची पावडर, विविध प्रकारचे मसाले, पीठ तसेच डाळींचे प्रक्रिया उत्पादन केले जाते. तयार मालाची विक्री माळंदा गावासह धानोर येथील स्थानिक बाजारपेठेत होते. या उद्योगातून दरवर्षी लाखो रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळत असून, कुटुंबाच्या आर्थिक गरजांना आधार आहे.
स्थानिक पातळीवर कच्च्या मालाचे मूल्यवर्धन होत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. या योजनेमुळे माझा आत्मविश्वास वाढला असून राहणीमानात सकारात्मक बदल झाला आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता इतर शेतकऱ्यांनीही शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करावेत.
- कृष्णा भुरकुरिया, माळंदा
