मधुकर डांगे
जिद्द, चिकाटी आणि आधुनिक शेतीतंत्रज्ञानाची योग्य सांगड घातली, तर माळरानावरही सोन्यासारखं पीक घेता येतं, हे नेहरूनगर (ता. कंधार) येथील वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालयाने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे.
महाविद्यालयाच्या परिसरात तब्बल २० एकर क्षेत्रावर तैवान जातीच्या पपईची यशस्वी लागवड करण्यात आली असून, आज या पपईला राजस्थान, काश्मीर आणि प्रयागराज यांसारख्या दूरच्या बाजारपेठांतून मोठी मागणी मिळत आहे.
नियोजनबद्ध सुरुवात, शास्त्रोक्त तयारी
महाविद्यालयाचे संचालक संजय शिवराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची आखणी करण्यात आली.
लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून रोटरच्या साहाय्याने उत्कृष्ट मशागत करण्यात आली. त्यानंतर ८ बाय ५ फूट अंतराचे बेड तयार करून लागवडीसाठी जमीन सज्ज करण्यात आली.
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला, तर पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यात आली.
सोलापूर येथील विश्वासार्ह रोपवाटिकेतून १३ रुपये दराने दर्जेदार रोपे आणून त्यांची शास्त्रीय पद्धतीने लागवड करण्यात आली. प्रारंभीच्या टप्प्यात या रोपांना दररोज केवळ दोन लिटर पाणी देण्यात आले.
कमी खर्चात अधिक उत्पादन
या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी प्रा. अविनाश इंद्रवाड यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. विशेष म्हणजे पपईचे हे पीक अवघ्या आठ महिन्यांत उत्पादन देण्यासाठी तयार झाले. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला दोन बहार (भार) येतात.
एका झाडाला सरासरी ५० ते ६० किलो वजनाची फळे मिळत असून, उत्पादन सातत्याने येत असल्याने बाजारात पुरवठा सुरळीत राखला जात आहे.
थेट बाजारपेठेशी जोड
पपईचा आकार, गोडवा आणि टिकाऊपणा यामुळे या उत्पादनाला स्थानिक बाजारासोबतच राजस्थान, काश्मीर आणि प्रयागराज येथील व्यापाऱ्यांकडूनही मागणी वाढली आहे.
दर्जेदार पॅकिंग आणि वेळेवर वाहतूक यामुळे पपई सुरक्षितपणे दूरच्या बाजारांपर्यंत पोहोचवली जात आहे. यामुळे महाविद्यालयाला चांगला आर्थिक परतावा मिळत असून, विद्यार्थ्यांसाठीही हा प्रकल्प प्रात्यक्षिक शिक्षणाचा आदर्श नमुना ठरत आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग
ही यशकथा केवळ एक शेती प्रयोग नसून, विद्यार्थी, शेतकरी आणि नवउद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरणारी केस स्टडी आहे.
योग्य नियोजन, कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेची अचूक निवड केली, तर कोरडवाहू व माळरानी भागातही नगदी पिकांमधून भरघोस उत्पन्न मिळवता येतं, हे या प्रकल्पातून स्पष्ट झालं आहे.
कंधारच्या माळरानावर उगवलेली ही पपई आज थेट काश्मीरपर्यंत आपला गोडवा पोहोचवत असून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवी दिशा दाखवत आहे.
हे ही वाचा सविस्तर : जंगलात वेचलेलं 'मोहाळ' ठरतंय आदिवासींचं सुवर्णभांडार वाचा सविस्तर
