दत्ता लवांडे
"मी २०१७ सालापासून पूर्णवेळ सेंद्रिय शेती करतोय, सुरुवातीला उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली होती पण आज मी पिकवलेला शेतमाल १००% सेंद्रिय आहे. माझ्या शेतमालात केमिकलचा अंश जरी सापडला तरी मी माझा ७/१२ तुमच्या नावावर करून देण्यास तयार आहे." शेती करणाऱ्या २६ वर्षीय युवा शेतकऱ्याने हे ठणकावून सांगितलंय. पोटापाण्यासाठी आणि नोकरी धंद्यासाठी शहराकडे स्थलांतर होत असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत हा युवक नेटाने सेंद्रिय शेती करतोय. (Organic Farming)
पोटापाण्यासाठी आणि नोकरी धंद्यासाठी शहराकडे स्थलांतर होत असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत हा युवक नेटाने सेंद्रिय शेती करतोय. सौरभ खुटवड. पुण्यातल्या भोर तालुक्यातील बारे खुर्द येथील हा तरुण शेतकरी. भाटघर धरणाच्या बॅकवॉटर ला असलेल्या वडिलोपार्जित १६ एकर क्षेत्रामध्ये सौरभ सेंद्रिय शेती करतो. (Organic Farming)
सफरचंदाचा शेतकरी अशी ओळख असलेला सौरभ हातसडीचा तांदूळ, कलिंगड, सफरचंद, भाजीपाला आणि इतर शेतमाल थेट विक्री करून वर्षाकाठी १० लाखांपेक्षा जास्त नफा कमावत आहे. शेतात पिकवलेल्या सेंद्रिय शेतमालाची शेतातच विक्री करून त्याने सह्याद्रीच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श घडवून आणलाय. (Organic Farming)
साधारण २०१७ साली बी.ए. चे शिक्षण घेत असताना त्याने पूर्ण वेळ सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी पूर्णपणे केमिकल खतांचा आणि औषधाचा वापर थांबवल्यामुळे उत्पन्नामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली.
पण सौरभ जे काय करतोय त्यावर त्याच्या कुटुंबाचा विश्वास होता आणि पाठिंबाही. मग त्याने पुढे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. ४५ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असणाऱ्या भागामध्ये त्याने यशस्वीरित्या सफरचंदाची शेती करून दाखवली.
यासोबतच सायबेज संस्थेच्या मदतीने शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी वाव मिळाला. सौरभला शेती करताना लागणारे ड्रिप, मल्चिंग पेपर आणि रोपे, वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य या संस्थेवरून मिळाले. पुढे बायफ, आगरकर इन्स्टिट्यूट यासारख्या प्रतिष्ठित संस्थेसोबत त्याने काम करायला सुरुवात केली.
महिंद्रा ॲग्री या खाजगी संस्थेने विकसित केलेल्या बियाणांच्या वाणाच्या ट्रायल सुद्धा सौरभच्या शेतावर घेतल्या जात आहेत. यामुळे विविध तज्ज्ञ, शास्त्रज्ञांशी त्याचा जवळून संबंध आला आणि शेतीमध्ये त्याला मोठा फायदा झाला.
शंभर टक्के सेंद्रिय शेती
२०१७ सालापासून सौरभ आपल्या शेतामध्ये कसलाच केमिकलचा वापर करत नाही. मातीला सुपीक बनवण्यासाठी त्याने जास्तीत जास्त गांडूळ खत आणि जीवामृताचा वापर केला.
यासोबतच वर्मी वॉश, दशपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र, ह्युमिक ऍसिड आणि जैविक बुरशींचा वापर तो शेतीमध्ये करतो. घरच्या गाईंचे शेण असल्यामुळे त्याला गांडूळ खत बनवण्यासाठी जास्त खर्च येत नाही. यासोबतच जैविक खते बनवण्यासाठी त्याने आपल्या शेतामध्ये छोटा प्रकल्प उभा केला आहे.
पिके आणि विविध प्रयोग
तो आपल्या जास्तीत जास्त क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने भात पिकाची लागवड करतो. पण भात पिकामध्ये त्याने चारसुत्री पद्धतीचा अवलंब केल्यामुळे वाऱ्यापासून संरक्षण आणि उत्पन्नात चांगली वाढ होते.
यासोबतच त्याने एकात्मिक भाजीपाला लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. यामध्ये त्याने पावटा, गवार, भेंडी, टोमॅटो, मिरची, वांगी, झेंडू आणि इतर भाजीपाला घेतला आहे. येणाऱ्या काळात स्ट्रॉबेरी लागवड, ड्रॅगन फ्रुट लागवड, शेळीपालन, ससे पालन, बदक पालन असे विविध प्रयोग तो शेतावर करणार आहे.
कृषी विभागाचे ट्रेनिंग सेंटर
सौरभने मागील ७ ते ८ वर्षांत केलेल्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगामुळे भोर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून सेंद्रिय शेतीचे ट्रेनिंग सेंटर सौरभच्या शेतावर उभारण्यात आलेले आहे.
या माध्यमातून तालुक्यातील शेतीचे प्रशिक्षण दिले जात असून सौरभ हा सेंद्रिय शेती ट्रेनर म्हणूनही काम करतो. या कार्यशाळेसाठी त्याने शेतावरच बांबूपासूनच एक हॉल बनवला आहे.
उत्पन्नाला शेतीपूरक व्यवसायाची जोड
शेत पिकांसोबतच ताजे उत्पन्न मिळावे यासाठी सौरभने आपल्या शेतामध्ये कृषी पर्यटनाला सुरुवात केली आहे. त्याच्याकडे सध्या १०० हून अधिक गावरान कोंबड्या असून रोज त्याला १५ ते २० अंडी मिळतात.
यासोबतच त्याच्याकडे दुधासाठी ७ गायी असून त्यातून दररोज ४० ते ४५ लिटर दूध विक्री केले जाते. या माध्यमातूनही त्याला दिवसाला हजार ते १ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळते. अधिक उत्पन्नासाठी त्याने शेत तळ्यामध्ये मत्स्य पालनही केले असून येणाऱ्या काळात शेळीपालन, ससे पालन आणि बदक पालनही करण्याचा त्याचा निर्णय आहे.
शेतीतील नफा
मागील ७ ते ८ वर्षांपासून सेंद्रिय शेती करत असल्यामुळे सौरभची भोर तालुक्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगली ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचा सर्व शेतमाल शेतातूनच विक्री होतो.
यामध्ये तांदूळ, कलिंगड, भाजीपाला, सफरचंद, फळपिके आणि इतर अन्नधान्यांचा समावेश असतो. कृषी पर्यटन, जोड व्यवसाय आणि शेतमालाच्या विक्रीतून त्याला वर्षाकाठी दहा लाखांपेक्षा जास्त निव्वळ नफा मिळतो.
सौरभच्या या १०० टक्के सेंद्रिय शेती प्रवासामध्ये त्याचा मोठा भाऊ आणि आई-वडिलांची मोठी साथ आहे. वडील दत्तात्रय नारायण खुटवड, आई द्रौपदा आणि भाऊ अजय यांनी दिलेल्या पाठिंबामुळे मी हे करू शकलो असे सौरभ अभिमानाने सांगतो.
सेंद्रिय शेती हे एक 'मिथ' आहे असे सांगणाऱ्यांसाठी सौरभने चपराक लावली आहे. सह्याद्रीच्या दुर्गम भागातील सौरभचा समृद्ध करणारा प्रवास शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी प्रेरणा देणारा ठरतो.