- भाऊराव वाळके
नाशिक : येवला तालुक्यातील मुखेड येथील अल्पभूधारक शेतकरी कृष्णराव काळे यांनी वीस गुंठे क्षेत्रावर नागवेलीचा पानमळा फुलवला आहे. या पिकातून वर्षाकाठी दोन- तीन लाखाचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे इतर बागायतदार शेतकऱ्यांनाही लाजवेल असे उत्पादन पान मळ्यातून घेत आहेत.
शेती व्यवसाय दिवसेंदिवस खर्चिक बनत चालला असून शासनाची आयात- निर्यातीचे चुकीच्या धोरणामुळे तरुण पिढी शेती व्यवसायापासून दूर होत चाललेली असली तरी अनेक तरुण शेतीमध्ये विविध प्रयोग राबवून एक आदर्श शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातलेच हे शेतकरी कृष्णराव काळे. गेली सात वर्षापासून ते स्वतः नागवेलींचे उत्पादन घेत असून तीन पिढ्यांपासून पाने विक्रीचा व्यवसाय देखील करीत आहेत.
पांगरा आणि शेवग्याचा आधार
कृष्णराव काळे यांना वीस गुंठे जमीन असून गेली सात वर्षापासून पानमळ्यातून उत्पादन घेत आहेत. नागवेलींच्या वेलीसाठी पांगारा आणि शेवग्याच्या झाडाचा आधार घ्यावा लागत असल्याने या झाडांची लागवड सुरवातीला करावी लागते.
उत्पादन कमी पण भाव जास्त
सध्या अतिवृष्टीचा फटका नागवेलीच्या पानांनाही बसला असल्यामुळे बाजारभाव वाढलेले दिसत आहे. सध्या १०० पानांसाठी १०० रुपयांपासून ते दोनशे रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत भाव वाढलेले दिसत आहे.
खते, औषधांची बचत
नागवेलींच्या पानासाठी साधे कीटकनाशक व कुजलेले शेणखत या व्यतिरिक्त दुसरा खर्च येत नाही, त्यामुळे नागवेलींचा पानमळा फायदेशीर आहे.
पाने खाण्याचे फायदे
नागवेलीचे पान खाणे भारतातील जुनी परंपरा आहे. ही केवळ एक प्रथा नाही तर अनेक आरोग्य फायद्यांशी देखील संबंधित आहे. नागवेलीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात जे पचन सुधारण्यास, श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास आणि दात निरोगी ठेवण्यास मदत करतात.
तसेच पानांमध्ये तंबाखू खाल्ल्यास कर्करोगाचा धोकाही संभवतो.
स्वतःचा नागवेलीची पाने विक्रीचा तीन पिढ्यांपासून व्यवसाय होता. वडिलोपार्जित वीस गुंठे जमीन असल्याने त्यामध्ये कोणती पिके घ्यावी, हा प्रश्न दरवर्षी पडत होता. त्यामुळे आपल्या व्यवसायाला आपल्यात शेतात कायमस्वरूपी नागवेलींचा पानमळा करण्याचा विचार आला आणि पूर्ण वीस गुंठे क्षेत्रावर पांगारा आणि शेवग्याच्या झाडांचे रोपे लागवड करून नंतर नागवेली पानांचा पानमळा तयार केला. आज सात वर्षापासून चांगल्या प्रकारे उत्पादन निघत असून वर्षाकाठी दोन अडीच लाखापर्यंत उत्पादन निघत आहे.
- कृष्णाराव काळे, नागवेली (पानमळा) उत्पादक शेतकरी मुखेड
