नाशिक : महिला शेतकऱ्यांना ड्रोन पायलट करण्याऱ्या ‘उमेद’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी नाशिक जिल्ह्यात करण्यात आली असून शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. ड्रोनच्या माध्यमातून पिकांवर फवारणीसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती फुलविली जात आहे.
नमाे ड्राेन दीदी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तीन महिला शेतकरी पायलट झाल्या आहेत. त्यातील दीपाली बापू मोरे (जळगाव, ता. निफाड) या राज्यातील पहिल्या ड्रोन पायलट बॅचच्या प्रशिक्षित शेतकरी महिला ठरल्या आहेत.
दीपाली मोरे यांच्याशिवाय स्वीटी सागर शेळके, प्रियांका मोहिते (दोघे रा. पिंपळगाव बसवंत) या महिला शेतकऱ्यांनी देखील ड्रोनचे प्रशिक्षण घेतले आहे. जिल्ह्यात या तीनच ड्रोन पायलट शेतकरी असून १३४ प्रस्ताव शासनदरबारी वर्षापासून पडून आहे. त्याला मान्यता मिळाल्यास १३४ महिला शेतकरी देखील ड्रोनच्या माध्यमातून पिकांना फवारणी करू शकतील.
गरिबीवर मात करून ड्रोन पायलटचे स्वप्न साकार
एम.ए.झालेल्या दीपाली बापू मोरे या महिला शेतकऱ्याने खडतर परिस्थितीला तोंड देत तसेच गरिबीवर मात करून ड्रोन पायलट होण्याचे स्वप्न बाळगले. शिक्षण, अभ्यास या गोष्टींना मागे टाकत दहा वर्षे झाली होती; पण हार मानली नाही. माहेरी अन् सासरी असलेल्या शेतीत सततचे नुकसान पहावले गेले नाही. अन् शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे ठरविले. त्या राज्यातील पहिल्या बॅचच्या ड्रोन पायलट शेतकरी आहेत.
केवळ साधी गृहिणी ते ड्रोन पायलट हा त्यांचा प्रवास थक्क करणाराच. लहान लेकरू तसेच कुटुंबाला सोडून पंधरा दिवस ड्रोन प्रात्यक्षिकसाठी पुण्यात राहावे लागले. आतापर्यंत त्यांनी ३३०० एकरांवर ड्रोनद्वारे फवारणी केली असून स्वत:च्या शेतीसोबत ज्या शेतकऱ्यांना पिकांवर ड्रोन फवारणी करायची आहे, त्यांनाही ते ड्रोन उपलब्ध करून देतात. त्यासाठी नाममात्र भाडे त्या घेतात. जे शेतकऱ्यांना मजुरी देण्यापेक्षा दुपटीने परवडणारे आहे. या माध्यमातून दीपाली या स्वत:च्या पायावरही उभ्या राहिल्या असून त्या ड्रोन भाड्याने देऊन महिन्याला ३५ हजार रुपये कमवीत आहेत.
- - खते, कीटकनाशक फवारणीसाठी ड्राेनचा वापर
- - ३० मिनिटे बॅटरी चार्ज केल्यावर दाेन एकरांवर फवारणी
- - ड्रोनमध्ये १० लिटर क्षमतेची टाकी
- - एका महिला लाभार्थ्यासाठी केंद्र सरकारचे १४ लाख रुपये मोफत
- - मंजूर निधीत ड्राेन, त्यासाठी थ्री व्हीलर वाहन, तसेच जनरेटर अन् प्रशिक्षण
मी लीजवर शेती घेतली. शिक्षण बी.कॉम. झाले असले तरी दिवसभर शेतात रमते. आतापर्यंत तीन हजार हेक्टरवर ड्रोनद्वारे फवारणी केली आहे. तसेच अन्य शेतकऱ्यांनाही ड्रोन उपलब्ध करून देते. माझ्या शेतात झेंडू, शेवंती, काकडी फुलविली आहे. को-पायलट ओंकार हिरे यांनाही रोजगार दिला आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शेती यशस्वी करता येते.
- स्वीटी शेळके, महिला शेतकरी
मूळचे आम्ही सांगली जिल्ह्यातील रहिवासी. उदरनिर्वाहासाठी १५ वर्षांपासून पिंपळगाव बसवंतला स्थायिक झालो. शेतीत मन रमविण्याचे ठरविले. म्हणून गावातील शेतांमध्ये जाऊन काम करू लागले. मूळ गावात असलेल्या शेतीकडेही लक्ष द्यावे लागते. पिकांसाठी फवारणीकरिता ड्रोनसाठी नंबर लागला. सोबत एकरी ४०० रुपये भाडे आकारून फवारणीसाठी ड्रोन देऊ लागले. शेतकरी ड्रोन पायलट म्हणून परिचय सांगताना अभिमान वाटतो.
- प्रियांका मोहिते, शेतकरी, पिंपळगाव बसवंत
