मारोती चिलपिपरे
कमी खर्च, जास्त नफा आणि रासायनिक खतांपासून दूर राहून आरोग्यदायी उत्पादन देणाऱ्या नैसर्गिक शेतीची दिशा दाखवत बाबुळगाव (ता. कंधार) येथील सुमनबाई बोराळे यांनी रानभाजी 'कर्टुले' लागवडीचा प्रयोग करून स्थानिक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.(Kartule Cultivation)
बाबुळगाव (ता. कंधार) येथील सुमनबाई बोराळे यांनी रानभाजी ‘कर्टुले’ लागवडीचा यशस्वी प्रयोग करून पंचक्रोशीत प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे. फक्त १० गुंठ्यांतून १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत त्यांनी सिद्ध केलं की सेंद्रिय शेतीतही नफ्याचा सुवर्णमार्ग सापडू शकतो.(Kartule Cultivation)
नैसर्गिक पद्धतीचा अवलंब
सुमनबाई बोराळे या नाबार्ड व संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोली यांच्या नैसर्गिक शेती प्रकल्पाशी जोडलेल्या प्रगतशील महिला शेतकरी आहेत.
सुरुवातीला त्यांनी मुळा, गाजर, भोपळा, कारले, पालक यांसारख्या भाज्यांची पायलट फेजमध्ये लागवड करून अनुभव घेतला.
त्यातून शिकून यंदा मे महिन्यात त्यांनी १० गुंठ्यांवर कर्टुले लागवड करण्याचा निर्णय घेतला.
लागवडीसाठी अर्धा किलो बियाण्यांचा ७ हजार रुपये खर्च झाला. ४ फूट × २.५ फूट अंतरावर लागवड केली.
जिवामृत व सेंद्रिय निविष्ठांचा वापर
कर्टुले पिकाच्या व्यवस्थापनासाठी रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे नैसर्गिक निविष्ठांचा अवलंब करण्यात आला.
जिवामृत, घनजिवामृत
नीमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्नास्त्र
या सेंद्रिय उपायांनी पीक कीड व रोगांपासून सुरक्षित राहिले, तसेच जमिनीची सुपीकता वाढली.
उत्पादन व नफ्याचे गणित
लागवडीनंतर केवळ ४५ दिवसांत उत्पादन सुरू झाले.
आठवड्याला सुमारे ५० किलो कर्टुले कंधार बाजारात प्रति किलो २०० रुपयांनी विक्री झाली.
आतापर्यंत ५०० किलो उत्पादनातून जवळपास १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
आंतरपिकातून कारले, दोडके व टोमॅटो यामुळे आणखी २० रुपये हजारांचे उत्पन्न मिळाले.
संपूर्ण खर्च फक्त १४ हजार रुपये असून नफा लक्षणीय आहे. पुढील १५–२० दिवस उत्पादन चालू राहणार असल्याने आणखी नफा अपेक्षित आहे.
सुमनबाईंचा हा उपक्रम स्थानिक महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. रासायनिक शेतीच्या ऐवजी नैसर्गिक पद्धतीने रानभाज्या व भाजीपाला पिकवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन साधता येते, हे त्यांच्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
नैसर्गिक शेतीतील 'कर्टुले' लागवडीचा हा प्रयोग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय मार्गाकडे वळण्याची दिशा देतो. कमी भांडवल, जास्त उत्पन्न आणि आरोग्यपूर्ण पिके हे या मॉडेलचे वैशिष्ट्य ठरले असून, सुमनबाई बोराळे यांचा हा प्रयोग कृषी क्षेत्रातील नवा मापदंड बनत आहे.
महिला शेतकऱ्यांसाठी आदर्श
नाबार्ड आणि सगरोली संस्थेच्या नैसर्गिक शेती प्रकल्पामुळे आत्मविश्वास वाढला. कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो, हे प्रत्यक्ष अनुभवले. नैसर्गिक शेती आणि भाजीपाला उत्पादनाचे एकत्रित मॉडेल राबवून पंचक्रोशीत नवा आदर्श निर्माण केला.-सुमनबाई बोराळे, शेतकरी