Join us

Farmer Success Story : दोन एकरात काढले 30 टन मोसंबीचे उत्पादन, येवल्याच्या शेतकऱ्यांची कमाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 17:13 IST

Farmer Success Story : आंतर पिकांना दिलेली खते, औषधे या ही मोसंबी पिकालाही (Mosambi Farming) लागू पडली. या व्यतिरिक्त मोसंबी पिकाला वेगळा खर्च केलेला नाही.

- सुनील गायकवाड नाशिक : पारंपरिक पिकांना फाटा देत वेगळी वाट जोखून दोन एकर मोसंबी फळ बागेची (Mosambi Farming) लागवड करून येवला तालुक्यातील एरंडगाव येथील रावसाहेब पाटील व दिलीप पाटील या युवा शेतकऱ्यांने तब्बल तीस टन मोसंबी फळांचे उत्पादन घेऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श ठेवला आहे.

नाशिक जिल्हा तसा द्राक्षे आणि कांदा उत्पादनासाठी (Kanda Farming) जगप्रसिद्ध आहे. या दोन पिकांबरोबरच डाळींब, आंबा, पेरू, चिकू, लिंबू, टोमॅटो या फळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. इतर पारंपरिक पिके बहुतांश शेतकरी घेतात. मात्र रावसाहेब व दिलीप या युवा भावांनी या भागात येणारी व पारंपरिक पिकांना फाटा देत विदर्भात मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारे मोसंबी हे फळ पीक नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) येवला तालुक्यातील एरंडगाव येथे घेण्याचा निर्णय घेतला. 

या दोन्ही भावांनी न्यू शेलार या वाणाची ८X१२ या अंतरावर दोन वर्षांपूर्वी लागवड केली. गत वर्षी मोजके उत्पादन मिळाले. मात्र यंदा एकाएका झाडाला तब्बल २० -२२ किलो मोसंबी लगडलेली आहेत. मोसंबी बागेत कांदा, हरभरा, सोयाबीन, आदी पारंपरिक पिकेही वेळच्या वेळी घेत आहेत. दोन एकर शेतात ७० रुपया प्रति रोप या प्रमाणे १४५० मोसंबी रोप लावण्यात आले. दोन वर्षात याच शेतात आंतर पिकेही घेतली. 

दरम्यान त्या आंतर पिकांना दिलेली खते, औषधे या ही मोसंबी पिकालाही लागू पडली. या व्यतिरिक्त मोसंबी पिकाला वेगळा खर्च केलेला नाही. २५ रुपये प्रतिकिलो या प्रमाणे व्यापाऱ्याने माल खरेदी केला आहे. एका झाडाला २० किलो ते ३० किलो फळ लागलेली आहेत. सुमारे ३० टन मोसंबी विक्रीतून या दोघा भावांना ७ लाख २५ हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. 

इतर पारंपरिक पिकांना मशागती पासून पीक बाजारात पोहोचविण्या पर्यंत प्रचंड खर्च झालेला असतो. मात्र तरीही उत्पन्न शास्वती नाही. त्यामुळे आम्ही दोघं भवांनीच विचार करून वेगळी वाट निवडायचे धारिष्ट्य केले. मात्र अपेक्षेपेक्षा अधिक लाभ आम्हाला झाला आहे.- रावसाहेब पाटील, मोसंबी उत्पादक शेतकरी,  एरंडगाव, ता. येवला

फळबागांसाठी शासनाच्या अनेक अनुदान योजना आहेत. मात्र आम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही. ७० रुपये प्रति रोप, याप्रमाणें १४५० मोसंबी रोप खरेदी केले. मशागती सह संत्री लागवड करायला आम्हाला फक्त सव्वा लाख रुपये खर्च आला. उत्पन्न मात्र मोठ्या प्रमाणात मिळत आहे. - दिलीप पाटील, मोसंबी उत्पादक शेतकरी, एरंडगाव, ता. येवला

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेतीशेतकरीफळेनाशिक