विष्णू वाकडे
जालना तालुक्यातील वानडगाव येथील प्रगतिशील शेतकरी लहू नागवे यांनी बदलत्या हवामानाच्या आव्हानातही आशेचा नवा अंकुर फुलवला आहे. पारंपरिक पिकांऐवजी दोन एकर क्षेत्रात सीताफळ बाग फुलवून त्यांनी आपल्या शेतातून समृद्धीचा सुवास दरवळवला आहे. (Farmer Success Story)
अतिवृष्टीमुळे इतर पिकांवर मोठा फटका बसला असला, तरी सीताफळ बागेमुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळाला आहे. लहू आणि त्यांच्या पत्नी कुंता नागवे यांनी बागेतून स्वतः फळे तोडून विक्रीही केली, आणि हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
सीताफळ शेतीचा प्रयोग
२०१९ मध्ये लहू नागवे यांनी बालानगर या वाणाची दोन एकरांत लागवड केली. कमी खर्च, कमी देखभाल आणि चांगले उत्पन्न मिळणारे हे फळपीक असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
आज या बागेत फळांनी भरभराट झाली असून, त्यांना ३०० क्रेट सीताफळांचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. प्रति क्रेट ७०० रुपये दराने विक्री होत असल्याने २ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
अतिवृष्टीचा फटका, पण सीताफळाने दिला दिलासा
यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे नागवे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. तरीसुद्धा सीताफळ बागेमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. त्यांनी सांगितले, “इतर पिकं वाहून गेली, पण सीताफळ बाग उभी राहिली. आता याच बागेमुळे आमच्या घरात दिवाळी उजळली आहे.”
कुटुंबाची साथ, परिश्रमाची ताकद
या यशामागे लहूराव नागवे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुंता नागवे यांचाही मोठा वाटा आहे. हे दांपत्य स्वतः फळांची तोडणी करते आणि बाजारात विक्रीसाठी जातं. विक्रीसाठी त्यांनी मंठा येथील व्यापारी जुबेर बागवान यांचाही सहयोग घेतला आहे. आतापर्यंत ६०% पेक्षा जास्त फळांची विक्री झाली असून, मागणीही वाढत आहे.
यशाचा मंत्र
कमी खर्च, कमी पाणी, पण जास्त उत्पादन
‘बालानगर’ वाणाचे उच्च प्रतीचे फळ
कुटुंबाचा श्रम आणि योग्य बाजारपेठेची निवड
हवामानाशी जुळवून घेतलेले नियोजन
सीताफळ बागेमुळे आमची दिवाळी गोड झाली
अतिवृष्टीमुळे मोसंबी, डाळिंब, केळी यासारखी पिकं अडचणीत आली आहेत. पण लहू नागवे यांच्या सीताफळ बागेचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. योग्य व्यवस्थापनाने हे पीक अत्यंत फायद्याचे ठरू शकते. - विष्णू राठोड, तालुका कृषी अधिकारी, जालना
अतिवृष्टीने इतर पिकांवर काळे ढग दाटले असताना, लहू नागवे यांच्या सीताफळ बागेने त्यांच्या जीवनात आशेचा नवा सूर्य उगवला आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवणारा हा प्रयोग आज परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरत आहे.