नंदकिशोर नारे
पारंपरिक शेती सोडून नवे प्रयोग करण्याचे धाडस वाशिमच्या तरुण शेतकऱ्याने दाखवले. झेंडू व गुलाब फुलांच्या लागवडीमुळे त्यांना अल्पावधीत मोठा नफा मिळाला असून, फुलशेती शेतकऱ्यांसाठी नवे दालन उघडतेय आहे.(Farmer Success Story)
सुरुवात वेगळ्या विचाराने
पारंपरिक पिकांमध्ये मोठा खर्च, अनिश्चित हवामान आणि कमी दर यामुळे शेतकऱ्यांचा नफा घटतो. पण वाशिम जिल्ह्यातील तरुण शेतकरी राहुल इंगोले यांनी वेगळा विचार करून फुलशेतीचा मार्ग निवडला.
श्रावण महिन्यात होणाऱ्या सण-उत्सवांमध्ये झेंडू फुलांना मोठी मागणी असते, हे त्यांनी ओळखले आणि मे महिन्यातच झेंडूची लागवड केली.
तीन महिन्यांत मिळवला अफाट नफा
अवघ्या दोन एकर क्षेत्रात झेंडूची लागवड करून त्यांनी फक्त तीन महिन्यांत खर्च वजा करता तब्बल ६ लाख रुपये निव्वळ नफा मिळवला.
झेंडूला बाजारात १०० ते १२० रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळाला.
वाशिम सोबतच अकोला आणि हिंगोली जिल्ह्यांतूनही झेंडूची मोठी मागणी झाली.
ग्राहकांचा विश्वास, शेतकऱ्याचा नवा मार्ग
श्रावण महिन्यात बाजारात ताजे झेंडू उपलब्ध नसतात. पण इंगोले यांच्या मेहनतीमुळे भाविकांना वेळेवर फुले मिळाली.
झेंडूसोबतच त्यांनी गुलाब फुलांचीही लागवड केली असून, त्यातूनही चांगल्या उत्पन्नाचा अंदाज आहे.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा
पारंपरिक पिकांऐवजी बाजारपेठेतील मागणी ओळखून पीकपद्धती बदलल्यास जास्त नफा मिळू शकतो.
फुलशेतीसारख्या पर्यायी शेतीत कमी कालावधीत मोठं उत्पन्न मिळण्याची संधी आहे.
योग्य वेळी पीक घेणे आणि योग्य बाजारपेठेची निवड करणे हे यशाचे गमक आहे.
राहुल इंगोले यांची फुलशेतीची कहाणी ही केवळ यशकथा नाही, तर इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे.
श्रावणासारख्या सण-उत्सव काळात ग्राहकांची गरज ओळखून त्यांनी शेतातूनच नवा मार्ग काढला आणि आपलं जीवन फुलवलं.
पारंपरिक पिकांपेक्षा फुलशेतीत जास्त नफा मिळतो. श्रावणातील पूजेसाठी आमच्या शेतातील ताजे झेंडू ग्राहकांना मिळतात, त्यामुळे तेही समाधानी असतात.- राहुल इंगोले, शेतकरी