Dairy Farming : शेलूबाजार परिसरात हरितक्रांतीनंतर आता ‘श्वेतक्रांती’ नव्या जोमाने फुलू लागली आहे. ग्रामीण भागात शेतीखेरीज रोजगाराच्या संधी मर्यादित असताना, दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य आणि विश्वासार्ह उत्पन्नाचा आधार बनतो आहे. (Dairy Farming)
लहान शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणुकीत सुरू होणारा हा व्यवसाय आज नव्या ग्रामीण क्रांतीचा मार्ग ठरतो आहे.(Dairy Farming)
श्वेतक्रांतीचा नवा अध्याय
१९९१ साली स्व. तुकाराम पाटील दूध उत्पादक सहकारी संस्थेमुळे शेलूबाजार परिसरात दुग्धक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांद्वारे म्हशी घेतल्या, पण नंतर खंड पडल्यामुळे दूधटंचाई निर्माण झाली. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे गावोगावी दूध कॅन फिरताना दिसतात आणि 'दूधगंगा' वाहू लागली आहे.
दोन म्हशींवरून ४० पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
शेंदुरजना मोरे येथील पशुपालक धनंजय वानखेडे यांनी केवळ दोन म्हशींनी सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यात ४० हून अधिक उच्च प्रतीच्या म्हशी असून, ते दररोज २०० ते २५० लिटर दूध संकलित करतात.
उत्तर प्रदेश, गुजरात आणि हरियाणाहून म्हशी विकत घेऊन त्यांनी व्यावसायिक पातळीवर दुग्धउद्योग उभा केला.
प्रशिक्षित कामगारांच्या मदतीने चालविलेल्या या उद्योगातून त्यांना दरमहा दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
वानखेडे यांच्या या यशाने परिसरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. अनेक बेरोजगार तरुण स्वतःच्या मेहनतीवर आणि कर्जाच्या सहाय्याने दुग्धव्यवसायाकडे वळत आहेत.
ग्रामीण भागात वाहतेय 'दूधगंगा'
पूर्वी नागरिकांना दुधासाठी बाजारात जावे लागायचे, पण आता प्रत्येक गावात खाजगी डेअऱ्या सुरू झाल्या आहेत. शेलूबाजारमधून दररोज सुमारे ६ हजार लिटर तर संपूर्ण परिसरातून १ हजार ते १ हजार २०० लिटर दूध संकलित होऊन मंगरुळपीर, कारंजा आदी ठिकाणी पाठवले जाते.
दुग्धव्यवसायाने बदलले जीवनमान
लाठी, हिरंगी, येडशी, चोरद, गोगरी, पिंप्री, तपोवन, इचा, नागी, माळशेलू, वनोजा आदी गावांमध्ये प्रत्येकी ५० ते ६० म्हशी असून दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशातील कामगारांनाही येथे रोजगार मिळाला आहे. प्रत्येक म्हशीच्या देखभालीसाठी दरमहा १ हजार ५०० इतके वेतन देऊन काम दिले जाते.
शासनाकडून अपेक्षित सहकार्य आवश्यक
दुग्धव्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी शासनाच्या पातळीवरून दूध दरवाढ, अनुदानित चारा, शेड बांधणीसाठी आर्थिक मदत आणि पशुवैद्यकीय सेवा सुलभ करणे आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या 'श्वेतक्रांती'ला पाठबळ दिल्यास ग्रामीण भागात आर्थिक समृद्धीची नवीन लाट उसळू शकते.
दुग्धव्यवसाय म्हणजे रोजचा पैसा आणि दीर्घकाळ टिकणारे स्थैर्य. मेहनत आणि शिस्त राखली, तर हा उद्योग गावागावात नव्या आशेचा किरण बनू शकतो. - धनंजय वानखेडे, पशुपालक