Custard Apple Farming : दुष्काळाचा सामना करतही आशा न सोडणाऱ्या शेतकऱ्यांची ही कथा आहे. मलकापूर (ता. भोकरदन) येथील सुखदेव बाळा वाघमारे यांनी पारंपरिक शेती सोडून कमी पाण्यात फुलणाऱ्या सीताफळ शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. (Custard Apple Farming)
आज त्यांच्या या निर्णयामुळे तीन एकर फळबाग त्यांना केवळ आर्थिकच नव्हे, तर आत्मविश्वासाचंही फळ देत आहे.(Custard Apple Farming)
दुष्काळी भागातून फळबाग शेतीचा आदर्श मार्ग
भोकरदन तालुक्यातील आन्वा जवळील मलकापूर गावातील प्रगतशील शेतकरी सुखदेव बाळा वाघमारे यांनी दुष्काळाच्या संकटावर मात करत एक नवा कृषी मार्ग शोधला आहे.
वर्षानुवर्षे पाण्याच्या तुटवड्यामुळे पारंपरिक पिकांचे नुकसान सहन केल्यानंतर त्यांनी फळबाग शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. कमी पाण्यात उत्पन्न देणाऱ्या सीताफळ शेतीचा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबवला आहे.
तीन एकरात नवा प्रयोग
सुखदेव वाघमारे यांनी तीन एकर क्षेत्रात १६ बाय ८ फूट अंतरावर सुमारे १००० सीताफळ झाडांची लागवड केली. ही झाडे कमी पाण्यावर तग धरणारी असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही चांगली वाढतात.
शिवाय, एकदा लागवड केल्यावर अनेक वर्षे सतत उत्पादन देतात. यामुळे ही शेती दीर्घकालीन उत्पन्न देणारी ठरते.
कौटुंबिक सहकार्याने मिळवले यश
पूर्वी पारंपरिक पिके घेत असताना दुष्काळामुळे नुकसान होत होते. मात्र, मुलगा प्रवीण वाघमारे यांच्या सहकार्याने सुखदेव वाघमारे यांनी फळबाग शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मेहनतीला आणि नियोजनबद्ध शेतीला आता फळ मिळत आहे.
अशी केली लागवड
पिक: सीताफळ
क्षेत्रफळ: ३ एकर
लागवड: १६x८ फूट अंतरावर १००० झाडे
पाण्याची गरज: अत्यल्प
उत्पन्न: सुमारे ४.५ लाख रुपये
उत्पन्नाचा नवा विक्रम
या वर्षी पहिल्या तोडीतूनच वाघमारे यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. उर्वरित तोड्यांमधून आणखी तीन लाख रुपयांपर्यंत नफा होण्याची शक्यता आहे. कमी खर्च, कमी पाणी आणि दीर्घकालीन उत्पन्न या तिन्ही गोष्टींमुळे ही शेती आता फायदेशीर ठरत आहे.
दुष्काळी भागातही योग्य नियोजन, पिकांची निवड आणि मेहनत यांच्या जोरावर शेतीत कसा नवा मार्ग काढता येतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुखदेव वाघमारे यांच्या या प्रयत्नामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.
सुखदेव वाघमारे यांची सीताफळ शेती ही फक्त आर्थिक यशाची गोष्ट नाही, तर दुष्काळी भागात नवकल्पना आणि चिकाटीचा विजय आहे. त्यांचा हा प्रयोग अनेक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
दुष्काळ आपल्याला थांबवू शकत नाही. योग्य नियोजन आणि पाण्याचे व्यवस्थापन केल्यास फळबाग शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवता येते. सीताफळाने आमचे जीवन बदलले. - सुखदेव वाघमारे, शेतकरी