Join us

खडकाळ माळरानावर बहरली देशी पावट्याची शेती; मानसिंगरावांना मिळाली हमखास उत्पन्नाची हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:03 IST

Farmer Success Story बिऊर ता. शिराळा येथील प्रगतशील शेतकरी मानसिंग शिवाजी पाटील यांनी शांतीनगर तलावाजवळ असणाऱ्या एक एकर खडकाळ शेतीत देशी पावट्याचे किफायतशीर पीक घेतले आहे.

सहदेव खोतपुनवत : बिऊर ता. शिराळा येथील प्रगतशील शेतकरी मानसिंग शिवाजी पाटील यांनी शांतीनगर तलावाजवळ असणाऱ्या एक एकर खडकाळ शेतीत देशी पावट्याचे किफायतशीर पीक घेतले आहे.

या पावट्याला गावातून मोठी मागणी होत आहे. आतापर्यंत या पावट्यापासून ७० हजारांचे उत्पन्न घेतले असून हंगामाच्या अखेरपर्यंत सव्वा लाखाचे उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे.

शिराळा तालुक्यातील बिऊर गाव भाजीपाला तसेच व्यापारी पिकासाठी प्रसिद्ध आहे. येथील अनेक शेतकरी आपापल्या शेतात विविध नवनवीन पिकांचे प्रयोग करत असतात.

येथील प्रगतशील शेतकरी मानसिंग पाटील यांचे शांतीनगर तलावाजवळ एक एकर माळाचे शेत आहे. pavata sheti या शेतात पूर्वी गवतपड होती.

नंतरच्या काळात मानसिंग पाटील यांनीही गवतपड काढून माळरानाचे हे खडकाळ शेत पिकासाठी तयार केले. यासाठी त्यांनी मोठा खर्च व मेहनत घेतली.

शिराळा ते चांदोली रस्त्यालगत असलेल्या या शेतात त्यांनी विविध प्रकारची व्यापारी पिके घेण्यास सुरुवात केली. गेल्या जून महिन्यात त्यांनी या माळरानाच्या शेतात देशी पावट्याची टोकन केली.

पीक उगवून आल्यानंतर शेतात बांबू रोवून पिकाला आधार दिला. योग्य व्यवस्थापन केले. पावसाळ्यात पीक चांगले जगून आले. त्यानंतर पिकाला पाण्याची आवश्यकता असल्याने त्यांनी आपल्या विहिरीवरील कमी पाण्यावर ठिबक सिंचनाची व्यवस्था केली.

या पिकाच्या संगोपनासाठी ५० हजारांचा खर्च केला आहे. सध्या हे त्यांचे देशी पावट्याचे पीक बहरात आले असून उत्पादन चालू झाले आहे. या पावट्याच्या पिकासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब परिश्रम घेत आहेत.

आत्तापर्यंत या अस्सल चवीच्या देशी पावट्यापासून त्यांना ७० हजारावर उत्पन्न मिळाले आहे. रस्त्याने येणाजाणारे लोक या ठिकाणी थांबून पावट्याची मागणी करतात.

दीडशे रुपये किलोप्रमाणे सध्या या पावट्याची विक्री केली आहे. हंगाम चालू झाला असून चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्वास मानसिंग पाटील यांना आहे.

देशी बियाण्याचे जतनमानसिंग पाटील यांच्या घरात तब्बल ५२ वर्षांपासून पावट्याच्या देशी बियाण्याचे जतन केले आहे. त्यातीलच बियाणे घेऊन त्यांनी या शेतात पीक घेतले आहे. या पावट्याला खूप चव असून लोकांची मोठी मागणी आहे.

शेतातूनच पावट्याची विक्रीहा पावटा ते कोणत्याही बाजारात विकायला पाठवत नाहीत. अनेक लोक या शेतावर येऊन पावट्याची खरेदी करत आहेत. दिवसभर त्याच ठिकाणी बसून ते पावटा विक्री करतात. हंगामाच्या अखेरपर्यंत या पावट्यापासून सव्वा लाखाचे उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे

पावट्याचे पीक घेताना मी फायदा तोट्याचा विचार केलेला नाही. माळरानाचे शेत पिकाखाली आले, याचा मोठा आनंद आहे. शेतात वेगळा प्रयोग करून पीक घेतल्याचे समाधान वाटते. - मानसिंग पाटील, शेतकरी, बिऊर, ता. शिराळा

अधिक वाचा: Amba Fal Mashi : आंब्यातील फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा एकदम कमी खर्चाचा सोपा उपाय

टॅग्स :शेतकरीशेतीपीकलागवड, मशागतभाज्यापेरणीसांगली