lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > सेंद्रीय आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

सेंद्रीय आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

Income of lakhs from organically grown mango orchards | सेंद्रीय आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

सेंद्रीय आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे. 

शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे. त्यांच्या शेतातील केशर आंबा निर्यातीस आवश्यक सर्व निकषाची पात्रता सिद्ध करीत गेल्या दोन वर्षात श्री. बाबर यांनी आंबा परेदशात निर्यात केला आहे. यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. याची दखल सातारा जिल्हा परिषदेने घेऊन कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. जे.के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांची ही यशकथा.

शेतकरी विविध पिकांसाठी शेतात रासायनिक खतांचा वारेमाफ वापर करीत असून रासायनिक खते व किटकनाशकांमुळे जमिनीचा पोत खराब होतो व खर्चही अधिक आहे या उलट जर शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा वापर केल्यास जमिनीचा पोत चांगला राहून शेती उत्पादनात सातत्य टिकून राहाते, याबरोबरच सेंद्रीय खताच्या वापरामुळे उत्पादित होणाऱ्या शेतमालाचा दर्जा वाढून परदेशात निर्यात करण्यासाठी निकषाची समस्या निर्माण होऊ शकत नाही याचा फायदा शेतीमालास जादा भाव मिळण्यास होते, असे श्री. बाबर आर्वजुन सांगतात.

उत्पादित शेती मालाला चांगला भाव मिळावा यासाठी श्री. बाबर यांनी प्रारंभी पासूनच सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. श्री. बाबर यांनी दीड एकरात दिडशे केशर, हापूस, गुलाल्या व रायवळ जातीच्या कलमी रोपांची लावगड केली. यामध्ये केशर आंब्याची १२० झाडे आहेत. ही झाडे १२ फुटाहून अधिक उंच वाढली आहेत. माण तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून पाणी टंचाई या समस्येवर मात करुन सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देवून आंब्याची बाग फुलवली आहे. सेंद्रीय शेतीसाठी त्यांना कृषि विभागाकडून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन संच, गांडूळ खत प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे.

आंबा रोपाची लागवड केल्यापासून आज अखेर त्यांनी या फळबागेत रासायनिक खते व किटकनाशकाचा पूर्णत: वापर टाळून नैसिर्गत पद्धतीने बागेची जोपासना गेली दोन वर्ष करीत आहेत. गत वर्षातील फळ हंगामात निर्यातक्षम सर्व निकषाच्या चाचणीत केशर आंबा पात्र ठरल्याने दिडशे रुपये किलो दराने बोगतच व्यापाऱ्यांनी खरेदी केली. यंदाच्या हंगामात गत वर्षातील फळांपेक्षा अधिक क्षमतेने दर्जा वाढलेला निदर्शनास आल्याने यंदाही परदेशात विक्रीसाठी निर्यात करण्यास व्यापाऱ्यांनी बागेतच आंबा खरेदी करण्यास पसंती दिली. नैसर्गिक पद्धतीने आंबा बाग जोपासण्याबाबत श्री. बाबर सांगतात, आंबा हे फळ झाड जंगली आहे. पूर्णत: नैसर्गिक पद्धतीनेच जर आंब्याची झाडे जोपासली फळधारणा त्यानंतर फळाचा आकार व वजन आणि विशेष बाब म्हणजे नैसर्गिक पद्धतीनेच पाड लागल्यानंतर तो पाला पाचोळ्यात आच्छादनात पिकविल्यानंतर फळाचा नैसर्गिक रंग व गोडवा व चवही वेगळीच अनुभवास आली आहे.

नैसर्गिक पद्धीने पिकवलेला आंबा लवकर नासत/सडत नाही. रासायनिक कार्बाईडचा वापर करुन जलद गतीने पिकविलेल्या आंब्याचा रंग एकसारखा गडद व आकर्षक असा जरी दिसत असला तरी तो आरोग्यासास हानिकारक असा आहे. हा आंबा लवकर सडतो हा  त्यातील फरक आहे. मी व माझी पत्नी बागेची वर्षभर निगा व देखरेख करीत असतो. बागेतील प्रत्येक झाडांना वाळलेले गवत, झाडांचा पाला पाचोळा, कुजलेले शेण तलावातील गाळाची माती एकत्रित मिश्रण करुन प्रत्येक रोपाच्या बुंध्याभोवती गोलआकार पसरुन ठिबक सिंचनाचा वापर करुन पाणी देत आहोत.

बाग लागवडीपासूनच रासायनिक खताचा वापर श्री. बाबर यांनी  टाळला आहे. तसेच झाडावर किटक नाशकाचा वापर केला नाही. झाडाच्या बुंध्या भोवती विविध कडधान्याबरोबरच देशी गायीच्या गोमुत्राची स्लरी जिवामृत वर्षातून तीन वेळा दिले. झाडांना मोहर फुलोरा आल्यानंतर परागीभवनासाठी मधमाशा व फुलपाखरांची यांची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. रासायनिक खताबरोबर विषारी किटकनाशकाच्या वापराचा अतिरेक वाढल्यामुळे पर्यावरण संतुलनात बदल झाला परिणामी आज शेतमळ्यात शोधूनही फुलपाखरे दिसून येत नाहीत. तरीही उपलब्ध मधमाशीची गरज पाहता बागेलगत पडीक जमिनीत गोदन, कवट, काजू, तुती, आवळा, चिकू, बोर, पेरु, आवळा, हादगा, नारळ, गोड व आंबट चिंच, सरस, ॲवाकोडा, सिताफळ, रामफळ, देशी केळी, जांभळ व डांबून, पॅशन फ्रुट, इत्यादी प्रकारची देशी विदेशी फळ-फुलांचीही लागवड केली यामुळे बागेत मधमाशांचा वावर वाढू लागला याचा फायदा आंबा बागेस होत आहे.

श्री. बाबर हे ऊसाचेही पीक सेंद्रीय पद्धतीने घेत आहेत. ऊसाचे गुऱ्हाळात गाळण करुन रासायनिक औषधे घटकांचा वापर टाळून पूर्णत: सेंद्रीय गुळ व काकवी उत्पादन करीत आहे. सेंद्रीय गुळाची व काकवीची बाजारपेठेत मागणी अधिक असल्याने अधिकच्या किंमतीमध्ये ही ग्राहक खरेदी करीत आहेत. मागणी जादा व पुरवठा कमी अशी स्थिती प्रत्येक वर्षी अनुभवास मिळत असून भविष्यकाळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असेही आवाहन ते करतात. विषमुक्त अन्न म्हणून सेंद्रीय उत्पादीत केलेल्या मालाकडे पाहिजे जाते. सेंद्रीय मालाला मुंबई, पुणे तसेच जिल्ह्यात मोठी मागणी आहे. मागणी प्रमाणे सेंद्रीय शेती उत्पादन  पुरवठा खूप कमी आहे. तसेच सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत केलेल्या मालाला चांगला दर ही बाजारपेठेत मिळत आहे. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढविले आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रीय शेतीकडे वळून विषमुक्त शेती करावी याला सर्वोतपरी सहकार्य कृषि विभाग करेल.

हेमंतकुमार चव्हाण
माहिती अधिकारी, सातारा

Web Title: Income of lakhs from organically grown mango orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.