जगन्नाथ कुंभार
मसूर : जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी पीक पालट म्हणून सध्या कमी दिवसात जादा उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
अशाच प्रकारे कराड तालुक्यातील कालगाव येथील शेतकरी रमेश चव्हाण यांनी १०० ते ११० दिवसात येणारे आणि इतर पिकांच्या तुलनेत जास्त उत्पादन देणाऱ्या चिराग वाणाच्या हरभन्याचे उत्पादन घेतले आहे.
अवघ्या एक एकर क्षेत्रावर हरभरा पीक आहे. यामधून त्यांना १८ ते २० क्विंटल उत्पादन आणि एक लाखाच्यावर उत्पन्न मिळण्याचा विश्वास आहे.
हरभरा हे रब्बी हंगामात येणारे पीक आहे. त्यामुळे शेतकरी हे कायमच रब्बी हंगामात हरभरा पिकाचे उत्पन्न घेत असतात. कालगाव येथील शेतकरी रमेश चव्हाण हे नेहमीच प्रगतशील व आधुनिक स्पर्धात्मक शेती करतात.
यापूर्वी त्यांनी भुईमूग पिकाच्या स्पर्धेत ३० गुंठ्यांत विक्रमी उत्पन्न घेतले होते. रमेश चव्हाण यांनी तीन फुटांच्या सरीवर ठिबक सिंचनाचा वापर करून दोन रोपांमधील अंतर आठ इंच व दोन ओळीतील अंतर बारा इंच असे एक एकरात १५ किलो बियाणे टोकण केले आहे.
टोकणीनंतर आठ दिवसात व्हीएसआयचे जैविक कीटकनाशक बुरशीनाशक अळवणी दिली. २० दिवसांनंतर ११:३६:२४ ची फवारणी केली व ठिबकद्वारे १२:३६:६ तीन मॅग्नेशिन प्लस ४ एस ३ किलो दिले.
४० दिवसांनी फुलधारणीच्या वेळी ८:१६:३९ बुस्टर प्लस टॉपर त्यामध्ये इएम १ कीटकनाशक प्लस पीसीटी ४१० बुरशीनाशकची फवारणी केली. ठिबकद्वारे १२ः६ः२२ प्लस १२ कॅल्शियम तीन किलो व मेगाफोस ३ किलो दिले.
७० दिवसांनी १२:५:२७ पृतव्याट प्लस ४९:३२ एकत्र फवारणी केली व ठिबकद्वारे ०:४२:४२ तीन किलो दिले. अशा पद्धतीने पिकाचे व्यवस्थापन करून वेळेवर गोष्टी करत असल्याने एकरात १८ ते २० क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे.
१५ किलो बियाणांचे टोकण
◼️ रमेश चव्हाण यांनी तीन फुटांच्या सरीवर ठिबक सिंचनाचा वापर केला.
◼️ दोन रोपांमधील अंतर आठ इंच व दोन ओळीतील अंतर बारा इंच असे एक एकरात १५ किलो बियाणे टोकण केले आहे.
◼️ टोकणीनंतर आठ दिवसांत व्हीएसआयचे जैविक कीटकनाशक बुरशीनाशक अळवणी दिली.
शेतकरी वर्गाने एकाच पिकाला चिकटून न राहता जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वेगवेगळी प्रयोगशील पिके घेऊन उत्पन्न काढायला हवे. त्यामुळे जमिनीत नियमित घेतली जाणारी पिके चांगली येण्यास मदत होते. यासाठी अशा पद्धतीची पिके घेण्यास हरकत नाही. - रमेश चव्हाण, कालगाव
अधिक वाचा: ३० एकरांची शेती केवळ वावर न ठेवता बनवली कृषी प्रयोगशाळा; वाचा प्रयोगशील बाळासाहेबांची यशकथा
