अरुण चव्हाण
हिंगोली जिल्ह्याच्या आडगाव रंजे (ता. वसमत) येथील अल्पभूधारक शेतकरी गणेश उत्तमराव सवंडकर यांनी पारंपरिक पिकांना बाजूला ठेवत आधुनिक पद्धतीने शेती करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. चार एकर शेती असलेल्या सवंडकर यांनी या वर्षी केवळ ३५ गुंठे क्षेत्रात काकडीची लागवड करून आतापर्यंत पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, अजूनही उत्पादन सुरूच आहे.
निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीन, ऊस, कापूस यांसारख्या पारंपरिक पिकांचे उत्पादन घटत आहे. मालाला भावही समाधानकारक मिळत नाही. त्यामुळे पर्याय शोधत सवंडकर यांनी काकडीची लागवड २ ऑक्टोबर २०२५ रोजी केली. लागवडीसाठी त्यांनी सुमारे तीन हजार रुपयांचे बियाणे वापरले. मजुरी, खते, फवारणी, आदींसह एकूण २२ हजार रुपये खर्च आला.
लागवडीनंतर अवघ्या दीड महिन्यात काकडीचे उत्पादन सुरू झाले. सध्या त्यांच्या शेतातून दररोज सहा ते सात क्विंटल काकडी निघत असून, या मालाला किमान अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल इतका बाजारभाव मिळत आहे. आतापर्यंत सात ते आठ टन काकडीचे उत्पादन झाले असून, हा माल स्थानिक बाजारपेठेसह पुणे बाजारातही विक्रीसाठी पाठवला जात आहे.
या विक्रीतून त्यांना अंदाजे पावणेदोन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. आगामी काळात अजूनही काकडीची तोड सुरू राहणार असून, एकूण तीन महिन्यांत दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा असल्याचे सवंडकर सांगतात. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन मिळत असल्याने त्यांच्या या प्रयोगाचे आसपासच्या शेतकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.
अनेक शेतकरी त्यांचे काकडीचे पीक पाहण्यासाठी भेट देत असून पारंपरिक पिकांऐवजी पर्यायी आणि आधुनिक पद्धतींचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कापूस, सोयाबीन, ऊस यांसारख्या पिकांमधून उत्पादन होत नसल्याने मी पर्याय शोधला. मिरची शेतीनंतर आता काकडीने चांगले उत्पन्न दिले. या उत्पन्नात मी समाधानी आहे, असे गणेश सवंडकर यांनी सांगितले.
