Join us

Farmer Success Story : मुंबईची नोकरी सोडून पालाकारांनी बारमाही शेतीतून शोधला अर्थार्जनाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:56 IST

वडिलांचे निधन झाल्यामुळे मुंबईतील नोकरी सोडून दत्ताराम शिवराम पालकर गावी आले. वडील शेती करत असल्याने त्यामध्ये लक्ष केंद्रित केले.

मेहरून नाकाडेरत्नागिरी: वडिलांचे निधन झाल्यामुळे मुंबईतील नोकरी सोडून दत्ताराम शिवराम पालकर गावी आले. वडील शेती करत असल्याने त्यामध्ये लक्ष केंद्रित केले.

दापोली तालुक्यातील वेळवी कलानगर येथील दत्ताराम पालकर सुरुवातीला पावसाळी भात व नाचणी शेती करत असत. संतोष मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बारमाही शेतीला प्राधान्य दिले.

विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून स्वतः शेतमाल विक्री करत आहेत. कलिंगड लागवड ते मोठ्या प्रमाणावर करीत असून, दरवर्षी ३० ते ४० टन कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत.

शेतीतील त्यांच्या योगदानामुळे गतवर्षी सेवाव्रती शिंदे गुरुजी आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन दत्ताराम पालकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबईतून गावी आल्यानंतर अर्थार्जनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शेतीतून हा प्रश्न मार्गी लावला आहे. सहा एकर क्षेत्रावर नियोजन करून विविध पिकांचे उत्पादन पालकर घेत आहेत.

विक्रमी कलिंगड उत्पादनपावसाळी भात, नाचणीसह चिबूड, काकडी, भोपळा, दोडके, पडवळ, घोसाळे भात कापणीनंतर पावटा, कुळीथ, वांगी, मिरची, टोमॅटो, विविध प्रकारच्या पालेभाल्यांचे उत्पादन घेत आहेत. याशिवाय चार एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड करतात. तीन टप्प्यात उत्पन्न मिळविण्यासाठी लागवड करतात. ३० ते ४० टन उत्पन्न मिळते. दापोली शहरात विक्री करतात. स्वतःच विक्री करत असल्यामुळे दर चांगला मिळतो. पेरणीपासून उत्पादन बाजारात पाठवण्यापर्यंत दत्ताराम पालकर स्वतः मेहनत घेतात. विक्रीची जबाबदारी त्यांची पत्नी दर्शना सांभाळतात. पालकर यांच्या स्टॉलवर सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात, विशेष म्हणजे स्वतःच्याच शेतातील असतात.

व्यावसायिक शेतीचे मार्गदर्शन संतोष मांडवकर यांच्याकडून मिळाले. त्यामुळेच आत्मविश्वास वाढला. ग्राहकांना ताज्या-ताज्या भाज्या उपलब्ध करून देण्याचा अट्टाहास असल्याने नियोजन करून लागवड करतो. - दत्ताराम शिवराम पालकर, वेळवी कलानगर

अधिक वाचा: शेतीमध्ये पहिलेच पाऊल टाकत केली या विदेशी पिकाची लागवड; खर्च वजा जाता तीन लाखांचे उत्पन्न

टॅग्स :शेतीपीकशेतकरीभाज्याकोकणरत्नागिरी