बापू नवले
केडगाव: खात्रीशीर घरचे उसाचे बेणे निवडून त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून एकरी ११५ टन उच्च उत्पादन दौंड तालुक्यातील खुटबाव येथील शेतकरी महादेव दत्तोबा शेलार यांनी घेतले आहे.
सुमारे ४७ कांड्या लांब एवढी प्रचंड वाढ उसाची झालेली होती. हिरवागार व वजनदार उसाची सुमारे १४ महिन्यात वाढ झाली. दहा महिने वाढ झालेल्या ८६०३२ या घरच्याच उसाच्या वाणाची निवड केली.
त्यामधील लांब कांड्या असलेला व डोळा फुगलेला ऊस निवडला. जमिनीवर खताच्या पिशव्या अंथरल्या. मातीत शेणखत मिसळले. उसाचे एक एक डोळ्यावर तुकडे केले. त्यानंतर ह्युमिक ऍसिड, बुरशीनाशक व कीटकनाशकामध्ये दोन दिवस बेणे भिजत ठेवले.
मातीमध्ये बेणे पुरल्यानंतर त्यावर दररोज शॉवरने दिवसातून तीन वेळा पाणी दिले. याप्रकारे रोपे तयार केल्यामुळे ही रोपे लागवडीच्या वेळी चटकन चिकटतात. त्यांची व्यवस्थित वाढ लगेच सुरू होते.
फुटव्यांची संख्या पण जास्त वाटते. रोपांची लागवड केल्यानंतर ड्रिंचिंग घेतले. नत्र फॉस्फरस व पोटॅश यांचा देखील वापर केला. मायक्रो न्यूट्रियंट वापरले. तीन फवारणी घेतल्या.
चाळणी व बांधणीच्या वेळी खतांचा डोस देण्यात आला. पाण्यातून वेगवेगळी खते सोडली. ड्रीप ऐवजी पाटानेच पाणी दिले. उसाची संपूर्ण वाढ १४ महिन्यात पूर्ण झाली. ११५ एवढे विक्रमी उत्पादन अवघ्या १४ महिन्यात मिळण्याचा त्यांनी प्रयोग केला.
उच्च उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या संपर्कात शेलार होते. या शेतकऱ्यांच्या प्लॉटला भेटी देऊन वेगवेगळ्या योजना त्यांनी माहीत करून घेतल्या. त्यामुळेच हे विक्रमी उत्पादन घेणे त्यांना शक्य झाले.
या उसाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ज्योतिबा शेती उद्योग भांडार खुटबावचे नागनाथ मुळीक यांनी मार्गदर्शन केले. संतुलित खतांची मात्रा वापरल्यास कांड्यांची वाढ जास्त होते.
४७ पेक्षा अधिक जास्त कांड्या असणारे बहुतांशी ऊस वाढलेले होते. एका ठिकाणी एकावर एक मोळ्या ठेवत मजुरांना ऊस तोडावा लागत होता. कारण एका उसाच्या बेटातील फुटव्यांची संख्या जास्त होते. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य झाले.
पूर्णवेळ लक्ष देऊन शेती केल्यास भरघोस उत्पादन मिळते. आमचे पारंपारिक ऊस हे पीक आहे. त्यामध्ये आम्ही नेहमीच प्रयोग करत असतो. बरेच वेळी माझ्या उसाचे उत्पादन १०० टनापेक्षा जास्त निघाले आहे. ऊस हुकमी एक असल्यामुळे कमी मजुरांमध्ये चांगले उत्पादन मिळते. - महादेव दत्तोबा शेलार, शेतकरी खुटबाव, ता. दौंड
खुटबाव परिसरात अनेक उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यामुळे उसासोबत विविध प्रकारच्या पिकांचे प्रयोग येथील शेतकरी करत असतात. ज्योतिबा शेती उद्योग भांडार च्या माध्यमातून आम्ही त्यांना खतांचे व्यवस्थापन प्राधान्याने समजावून सांगत असतो. त्याचा नक्कीच उपयोग शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीत होत आहे. - नागनाथ मुळीक, खुटबाव ता. दौंड
अधिक वाचा: Farmer Success Story : बोरगावच्या शिवाजी वाटेगावकरांनी केळी पिकात ११ महिन्यात केली ११ लाखांची कमाई