Join us

Farmer Success Story : आधी भाडेतत्त्वावर केली शेती; आता झाले कृषी व्यवस्थापनातील गुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 14:38 IST

कष्ट, जिद्द, चिकाटी आणि शेतीप्रेम यांच्या जोरावर दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील कृष्णा बाबू मोरे यांनी आदर्श शेतकऱ्याची ओळख निर्माण केली आहे.

शिवाजी गोरेदापोली: कष्ट, जिद्द, चिकाटी आणि शेती प्रेम यांच्या जोरावर दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील कृष्णा बाबू मोरे यांनी आदर्श शेतकऱ्याची ओळख निर्माण केली आहे.

शेती ही फक्त उदरनिर्वाहाचे साधन नसून, तो अधिक उत्पन्न देणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा व्यवसाय बनवता येतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

शेतीतून त्यांनी स्वतःचे आयुष्य बदललेच आहे, शिवाय अनेकांना त्यांनी हा यशाचा मार्ग दाखवला असल्याने कृषी व्यवस्थापनाचे गुरू म्हणून त्यांची ओळख झाली आहे.

शालेय शिक्षण घेण्याची संधी न लाभलेल्या कृष्णा मोरे यांनी आयुष्याच्या सुरुवातीला मुंबईत मजुरी केली परंतु लग्नानंतर त्यांनी आपल्या गावाची वाट धरली.

अवघ्या पाचशे रुपयांवर एका शेतकऱ्याकडे मजुरी करत शेतीची बाराखडी त्यांनी आत्मसात केली. शेतीतील अनुभवातून शिकत त्यांनी दोन एकर भाड्याने शेती घेतली आणि आपला शेतीचा प्रवास सुरू केला.

सुरुवातीच्या काळात असंख्य अडचणी आल्या, मात्र 'शेती हीच आपली माता' हा विश्वास त्यांनी कधीही सोडला नाही. मोरे यांना पत्नीची सतत साथ लाभली. वडिलोपार्जित शेती नसतानाही, मोलमजुरीऐवजी स्वबळावर शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

पडवळ, कलिंगड, काकडी यासारख्या पिकांपासून सुरुवात करत त्यांनी हंगामनिहाय योग्य पीक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि सेंद्रिय खतांचा वापर करत शेती उत्पादनक्षम बनवली.

आता जुलैच्या सुरुवातीलाच त्यांच्या शेतातील भाजीपाला काकडी, चिवुड मार्केटमध्ये दाखल होतो. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले.

व्यवस्थापन गुरूकृष्णा मोरे यांनी केवळ स्वतःच्या शेतीपुरते मर्यादित न राहता इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा दिली. त्यांनी अनेकांना मुंबईकडे जाण्यापासून परावृत्त करत शेतीकडे वळवले. कुडावळे पंचक्रोशीतील ५० ते ६० शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजीपाला, फळबाग, भात शेती आणि वरी-नाचणी यासारख्या पारंपरिक व सुधारित शेतीकडे वळले आहेत. त्यातून त्यांना कृषी व्यवस्थापनाचे गुरू म्हणून ओळख मिळाली आहे.

आता स्वतःची जागामोरे यांनी स्वतःच्या कष्टातून सात एकर जमीन विकत घेतली आहे. ही सर्व जमीन त्यांनी सेंद्रिय शेतीसाठी विकसित केली आहे. रासायनिक खते पूर्णपणे बाजूला ठेवून गांडूळखत आणि सेंद्रिय खतांचा वापर ते करतात. त्यांच्या गोठ्यातील जनावरांच्या शेणाचा उपयोगही खत निर्मितीसाठी केला जातो. शेतीला पूरक शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच दुग्ध व्यवसायही त्यांनी सुरू ठेवला आहे.

ग्रामीण शेतीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडरकृष्णा मोरे फक्त आदर्श शेतकरी नाहीत, तर ग्रामीण शेती व्यवस्थापनाचे बँड अ‍ॅम्बेसिडर बनले आहेत. कोणत्या हंगामात कोणते पीक घ्यायचे, बाजारपेठेची मागणी कधी वाढते, हे त्यांना अचूक ठाऊक आहे. ते आपल्या उत्पादनासह स्वतः मार्केटला जातात आणि विक्रीही स्वतःच करतात. यातूनच त्यांनी ही भरारी घेतली आहे.

अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

टॅग्स :शेतकरीशेतीभाज्यापीककोकणशेळीपालनभातफलोत्पादन