सिद्धार्थ सरतापेवरकुटे-मलवडी : हवामानातील बदल आणि पाण्याची टंचाई याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे असते. पण, अनेक शेतकरी यावर मात करुन लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात.
अशाच प्रकारे दुष्काळी माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथील सचिन नाना जेडगे या तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने उसाची शेती केली आहे.
त्यामुळे त्यांना एकरी ९७ टनाप्रमाणे एकूण ३ एकर १० गुंठे क्षेत्रात २९२ टन असे विक्रमी उत्पादन घेता आले. सध्या या शेतकऱ्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. तसेच त्यांनी अहोरात्र घेतलेल्या कष्टाचे कौतुक ही होत आहे.
माण तालुका म्हटले की पाऊस कमी. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई हे समीकरण आलेच. पण, येथील शेतकरी कष्टाळू आणि सध्या आधुनिक पद्धतीने शेती करत असल्याने चांगले उत्पन्न घेऊ लागला आहे.
सचिन जेडगे यांनी ८६०३२ या वानाच्या उसाची लागवड गेल्यावर्षी १५ जून रोजी केली होती. यामध्ये नांगरणी करून एकरी दोन ट्रॉली शेणखत टाकून त्यात डीएपी, युरिया १०:२६:२६ आणि २४:२४:०० ही खते घालून प्रथमतः उसाची बांधणी केली.
नंतर १५ ते २० दिवसांनी तणनाशकांची फवारणी करून घेतली. सुरुवातीला पाटाने पाणी दिले. काही दिवसांनंतर पाण्याची कमतरता भासू लागल्याने ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली.
१० कांड्यावर ऊस असताना पांढरा मावा पडला. त्यामुळे कीटकनाशकांबरोबर लिक्वीड खताची फवारणी केली. त्यानंतर मात्र रिझल्ट खूपच चांगला आला.
योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत◼️ माण तालुक्यातील बरकुटे मलवडी या गावाच्या पश्चिमेला तीन किलोमीटर अंतरावर महाबळेश्वरवाडी हे छोटेसे गाव आहे.◼️ येथील तरुण शेतकरी सचिन जेडगे यांनी उसातून चांगले उत्पादनही घेतले आहे.◼️ यासाठी योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली तर मुरमाड शेत जमिनीत ही उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते हेही दाखवून दिले आहे.◼️ तसेच सचिन जेडगे यांना पत्नी अर्चना आणि आई संगीता यांनीही साथ दिली आहे.
आधुनिक पद्धतीने शेती केली तर चांगले उत्पादन मिळते. आमच्या येथे पाण्याची उपलब्धता कमी असतानाही उसात चांगले उत्पादन घेऊ शकलो. मला उसाचे एकरी ९७ टन उत्पादन मिळाले आहे. तसेच यापुढेही शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. - सचिन जेडगे, शेतकरी
अधिक वाचा: दुभत्या जनावरांना उसाचे वाढे खायला देणं योग्य की अयोग्य; जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Sachin Jadge, a farmer from Man Taluka, overcame drought conditions to achieve record sugarcane production. He harvested 292 tons of sugarcane from 3 acres using modern farming techniques, earning local praise for his hard work and innovative approach.
Web Summary : मान तालुका के किसान सचिन जाडगे ने सूखे की स्थिति को पार करते हुए गन्ना उत्पादन में रिकॉर्ड बनाया। उन्होंने आधुनिक खेती तकनीकों का उपयोग करके 3 एकड़ से 292 टन गन्ने की कटाई की, जिससे उन्हें कड़ी मेहनत और नवीन दृष्टिकोण के लिए स्थानीय प्रशंसा मिली।