Join us

Dragon Fruits Success Story : खर्चाच्या तुलनेत मिळणार दुप्पट उत्पन्न; कृष्णा, भारत घाडगे या सख्ख्या भावांची ड्रॅगनफ्रूट शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:06 IST

Farmer Success Story : कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील शेतकरी बंधूंनी पहिल्यांदाच दोन एकर क्षेत्रात ड्रॅगनफ्रूट पिकाची लागवड केली आहे. या पिकाचे दोन वर्षानंतर एकरी १६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, त्यासाठी ७ लाख रुपये खर्च येतो.

दत्ता मोरस्कर 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील शेतकरी बंधूंनी पहिल्यांदाच दोन एकर क्षेत्रात ड्रॅगनफ्रूट पिकाची लागवड केली आहे. या पिकाचे दोन वर्षानंतर एकरी १६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, त्यासाठी ७ लाख रुपये खर्च येतो. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांनी ड्रॅगन फ्रूट बागेत आंतर पीक म्हणून कांदा आणि राजमाची लागवड देखील केली आहे हेही विशेष.

खातखेडा येथील कृष्णा घाडगे आणि भारत घाडगे या सख्ख्या भावांनी दोन एकर क्षेत्रात ड्रॅगनफ्रूट पिकाची लागवड केली असून, त्यात त्यांनी ५६०० कलमे लावली आहेत. ही कलमे शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथून खरेदी केली आहेत. या पिकाची लागवड या शेतकऱ्यांनी ४ सप्टेंबर २०२४ रोजी केलेली आहे.

लागवडी साठी खड्डे खोदणे, सिमेंटचे पोल लावणे, मजुरी, अंतर्गत मशागत, कलम, प्लेटो, सेंद्रिय खत, फवारणीसाठी सेंद्रिय औषधी याकरिता एकरभरातील या पिकासाठी सात लाख रुपये खर्च येतो. एकरभर क्षेत्रातून या ड्रॅगनफ्रूट पिकाचे १६ टन उत्पन्न होते. यातून १६ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. बाजारात ड्रॅगनफ्रूटला प्रति क्विंटल ९ ते १० हजार रुपये दर मिळतो. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक येथील बाजारात ड्रॅगनफ्रूटची विक्री केली जाते.

उन्हाळ्यात लागते कमी पाणी

या पिकाला पावसाळ्यात जास्त, तर उन्हाळ्यात कमी पाणी लागते. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई फारशी जाणवत नाही. वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, याकरिता या पिकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यात वन्य प्राणी कैद झाल्याबरोबर सायरन वाजल्यासारखा आवाज येतो. अशी सुविधा या कॅमेऱ्यात उपलब्ध आहे. या पिकामध्ये आंतरपीक म्हणून शेतकऱ्यांनी कांदा आणि राजमाची लागवड केली आहे. यामुळे हे वेगळे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.

कांदा, राजमाचे घेतले अंतरपीक

पारंपरिक पिके घेण्यापेक्षा नवीन पीक म्हणून आम्ही ड्रॅगनफ्रूट पिकाची दोन एकरांत लागवड केली. या पिकाचे दोन वर्षांनंतर एकरी १६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, त्यासाठी ७ लाख रुपये खर्च येतो. या पिकात आंतर पीक म्हणून कांदा आणि राजमाची लागवड केली आहे. यातून वेगळे उत्पन्न मिळणार आहे. - कृष्णा घाडगे, शेतकरी, खातखेडा.

हेही वाचा : Tomato Farming Success Story : एकरभर फळबागेवर भारी पडले टोमॅटो; वीस गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न घेणारे शिवहार पाटील

टॅग्स :शेतकरी यशोगाथाफळेबाजारफलोत्पादनछत्रपती संभाजीनगरमराठवाडाशेतकरी